भारत पुन्हा जगद्गुरू म्हणून उदयास यावा ः राज्यपाल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी घेतले साई दर्शन

नायक वृत्तसेवा, शिर्डी
साईबाबांच्या दर्शनासाठी येण्याचे सौभाग्य प्राप्त झाले. आज विश्वामध्ये साईबाबांची सर्वत्र पूजा केली जात आहे. साईबाबांच्या चरणी वंदन करून विश्वामध्ये धर्म आणि श्रद्धेची पताका फडकावी आणि भारत पुन्हा जगद्गुरू म्हणून उदयास यावा, अशी प्रार्थना साई संस्थानच्या अभिप्राय नोंदवहीत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वहस्ताक्षरात लिहून देशभक्तीचा संदेश दिला आहे.

दरम्यान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे अहमदनगर जिल्ह्यातील दोन दिवसीय दौर्‍यासाठी रविवारी (ता.30) शिर्डी येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन झाले. आगमनानंतर राज्यपाल कोश्यारी यांनी सायंकाळी धुपारती नंतर श्री साईबाबा मंदिरात जाऊन श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. साईबाबा संस्थानच्यावतीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे यांनी राज्यपालांचे आगमनप्रसंगी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

यावेळी साई संस्थानच्या विश्वस्त अनुराधा आदिक, अ‍ॅड. सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, सुरेश वाबळे, जयवंत जाधव, महेंद्र शेळके, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रवरा मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, पोलीस अधीक्षक मनोज पाटील, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनप्पा यमगर, उपविभागीय अधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, गटविकास अधिकारी समर्थ शेवाळे आदी मान्यवर उपस्थित होते. राज्यपालांनी साई संस्थानच्या नोंदवहीत व्यक्त केलेल्या अभिप्रायावरून त्यांची साईप्रती असलेली निस्सीम श्रध्दा आणी भक्ती दिसून आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *