कोपरगाव पालिकेच्या मुरुम वाहतुकीत गैरव्यवहार?

कोपरगाव पालिकेच्या मुरुम वाहतुकीत गैरव्यवहार?
माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांचा आरोप
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कोपरगाव नगरपालिकेने विशाल मजूर सहकारी संस्थेकडून लाखो रुपयांचा पालिका हद्दीत मुरुम टाकला असून, प्रत्यक्षात मुरुमाचा खडा टाकला की नाही; याबाबत मिळालेल्या माहितीतून संभ्रम निर्माण झाला आहे. सदर मजूर संस्थेने मुरुम उत्खनन व वाहतुकीचा परवानाच महसूल विभागाकडून घेतला नसल्याचे माहिती अधिकारात उघड झाले असल्याने पालिकेची मुरुम वाहतूकच संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे. या मुरुम घोटाळ्याची चौकशी होऊन संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी कोपरगावचे माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.


नोंदणीकृत मजूर संस्थेला काम देत असताना साधारण तीन लाखांच्या पुढील कामाची ई-निविदा काढावी लागते. परंतु तसे न होता विशाल मजूर संस्थेला सन 2016 पासून आजपर्यंत हा मुरुम वाहतुकीचा ठेका देऊन लाखो रुपयांचा मुरुम शहरात टाकण्याचे काम देण्यात आले होते. मात्र मुरुम उत्खनन आणि वाहतुकीचा महसूल विभागाचा परवाना अनिवार्य असतानाही महसूल दप्तरी सन 2016 ते 14 सप्टेंबर, 2020 अखेर महसूल विभागाची परवानगी घेतलीच नसल्याची बाब संजय काळे यांनी माहिती अधिकार कायद्यान्वये मिळालेल्या माहितीनुसार उघड केली आहे. विशाल मजूर सहकारी संस्थेने शहरात मुरुम टाकला हे सत्य असले तरी उत्खनन परवाना नसताना गजबजलेल्या शहरात मुरुम कसा टाकला गेला? कुणीही वाहतुकीच्या वेळी परवाना का विचारला नाही? शासनाची रॉयल्टी का बुडविण्यात आली? परवाना नसताना बिले कशी निघाली? असे अनेक प्रश्न माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी उपस्थित केले आहेत.


संस्थेच्या बिलातून रॉयल्टीची रक्कम वजा केलेली आहे!
मी एक वर्षापासून बांधकाम विभागाचे काम बघतो आहे. निविदा काढल्याशिवाय काम दिले जात नाही. मी कामकाज करत असल्यापासून विशाल संस्थेच्या बिलातून रॉयल्टीची रक्कम वजा करुनच बिले दिलेली आहे. ती रक्कम तहसीलकडे वर्ग झाली किंवा नाही याबाबत मुख्याधिकारीच सांगू शकतील.
– दिगंबर वाघ, (अभियंता, नगरपालिका कोपरगाव)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *