… अन्यथा शेतकर्‍यांना घेऊन महामार्गाला विरोध करू! सूरत-हैदराबाद महामार्गाच्या जमीन मोबदल्यावरुन राज्यमंत्री तनपुरेंचा इशारा

नायक वृत्तसेवा, राहुरी
राहुरी मतदारसंघातून जाणार्‍या सूरत-हैदराबाद (ग्रीनफिल्ड) अतिजलद महामार्गासाठी भूमी अधिग्रहण करताना समृद्धी महामार्गाच्या जमिनींसाठी दिलेल्या दराने मोबदला मिळाला पाहिजे. त्यापेक्षा कमी मोबदला देऊन, वेगळा न्याय दिल्यास शेतकर्‍यांसह महामार्गाला विरोध करू, असा इशारा ऊर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिला.

राहुरी तालुक्यातील कानडगाव येथे नवीन वीज उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन तनपुरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील काकडे होते. त्यापूर्वी त्यांच्या हस्ते तांभेरे, चिंचविहिरे, सोनगाव, सात्रळ, धानोरे येथे विविध विकासकामांचा प्रारंभ व लोकार्पण करण्यात आले. शिर्डी संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे, बाबूराव पटारे, जयराम गिते, नितीन गागरे, सागर मुसमाडे, भास्कर गाढे, अविनाश ओहोळ, दादासाहेब पवार, किशोर गागरे, डॉ. रवींद्र गागरे, सुभाष डुकरे, सोपान हिरगळ, मंजाबापू चोपडे, चांगदेव हारदे, गणेश कडू, मिलिंद अनाप उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना राज्यमंत्री तनपुरे म्हणाले, ‘मतदारसंघात सहा नवीन उपकेंद्रे उभारली. दोन उपकेंद्रांची क्षमता वाढवली. मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनींची कामे मोठ्या प्रमाणात मंजूर केली. 225 नवीन रोहित्रे दिले. त्यामुळे ऊर्जाविषयक पायाभूत सुविधा बळकट होणार आहेत. सत्तेचा वापर विकासकामांसाठी व सामान्य जनतेच्या हितासाठी करीत आहे. निळवंडे उजवा कालव्याच्या तालुक्यातील शेवटच्या टप्प्याच्या कामाची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे. कालव्यांच्या कामांसाठी मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार आशुतोष काळे, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्यासह मी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करीत आहे.’


राहुरी-नगर-पाथर्डी मतदारसंघात मागील पंधरा वर्षांतील ऊर्जाविषयक बॅकलॉग भरून काढण्याला प्राधान्य दिले आहे. तालुक्यातील लघुवीज केंद्रांना विद्युत पुरवठा करण्यासाठी 132/33 केव्ही क्षमतेचे वीज उपकेंद्र उभारणीचा मानस आहे. राज्यातील शेतकर्‍यांना दिवसा वीज देऊन न्याय देण्यासाठी मुख्यमंत्री सौर कृषीवाहिनी योजनेची व्यापकता वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
– प्राजक्त तनपुरे (ऊर्जा राज्यमंत्री)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *