भंडारदरा परिसरात पर्यटनास वन्यजीव विभाग अनुकूल! शासनाच्या नियमांना अधीन राहून सुरू होण्याचे सूतोवाच

नायक वृत्तसेवा, भंडारदरा
अकोले तालुक्यातील पर्यटनासाठी प्रसिद्ध असणार्‍या भंडारदरा धरणाच्या वन्यजीव विभागाच्या हद्दीत येणार्‍या पर्यटन क्षेत्राला लवकरच हिरवा कंदील मिळण्याचे संकेत आहे. या संदर्भात राज्य शासनाच्या नियमांना अधीन राहून पर्यटन संदर्भात सकारात्मक निर्णय घेतला जाईल असे सूतोवाच वन्यजीव विभागाकडून प्राप्त झाले आहेत.

अकोले तालुक्यातील पश्चिमेला भंडारदर्‍याला निसर्गाचा फार मोठा खजिना लाभलेला आहे. या निसर्गाच्या खजिन्याचा आनंद लुटण्यासाठी भंडारदरा तसेच वन्यजीव विभागाच्या हद्दीतील वेगवेगळ्या पर्यटन स्थळांना दरवर्षी लाखो पर्यटक भेट देत असतात. पंरतु गत दोन वर्षांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वन्यजीव विभागाला वेळोवेळी राज्य शासनाच्या आदेशाचे पालन करत पर्यटन बंद करावे लागले होते. सध्याच्या कालावधीमध्येही कोरोना या विषाणूजन्य रोगाच्या तिसर्‍या लाटेने पुन्हा कहर केल्याने परत एकदा वन्यजीव विभागाला नाईलाजास्तव पर्यटन बंद करावे लागले. त्यामुळे पर्यटनावर आधारित असलेल्या उद्योगधंद्यांना खीळ बसल्याने स्थानिक आदिवासी बांधवांचा रोजगारच हिरावला गेला. एकाच वेळेस सर्व पर्यटन थांबल्याने आदिवासी तरुणांवर उपासमारीची वेळ येऊन पोहोचली. हे पर्यटन परत सुरु व्हावे म्हणून आदिवासी तरुण पुन्हा पुढे सरसावले असून पन्नास टक्के पर्यटन चालू करुन रोजगार निर्मितीस प्राधान्य देण्याची विनंती राष्ट्रवादीचे ज्यष्ठ नेते अशोक भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे व माजी आमदार वैभव पिचड यांना या युवकांकडून निवेदन देण्यात आले आहे. या तीनही नेत्यांनी वन्यजीव विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक अधिकारी गणेश रणदिवे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे चर्चा करत पर्यटन कसे सुरु करता येईल यावर चर्चा केली आहे. वन्यजीव विभागही भंडारदर्‍याचे पर्यटन कसे सुरु करता येईल? याचा विचार करत आहे.

वन्यजीव विभाग जरी भंडारदरा पर्यटन सुरु करण्यास अनुकूल असले तरी राज्य शासनाने पर्यटन क्षेत्रातील गड व किल्ले पर्यटनास 100 टक्के बंद असल्याचा अध्यादेस जारी केल्याने वन्यजीव विभागाचीही अडचण झाली आहे. पर्यटन कसे सुरु करता येईल या संदर्भात काही पर्याय निघतोय का? याचा विचार सध्या करत आहे. परंतु, महाराष्ट्रातील सर्व शाळा सुरु झाल्याने पर्यटनासंदर्भातही लवकरच राज्य शासनाचा सकारात्मक निर्णय अपेक्षित असल्याचे वन्यजीव विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *