मराठा आरक्षण उपसमितीवरुन अशोक चव्हाणांना हटवा! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मराठा महासंघाने पाठविले निवेदन

नायक वृत्तसेवा, अकोले
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा आरक्षणविषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना तातडीने या पदावरून हटवावे, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे अहमदनगर जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

या संदर्भात पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मराठा निवेदन देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांच्यासह आप्पासाहेब कोडेकर, करण गायकर, धनंजय जाधव, किशोर मोरे, माधव देवसरकर, गंगाधर काळकोटे, रघुनाथ चित्र, नरेश मोरे यांच्यासह 25 समन्वयक चव्हाण यांच्या मेघदूत बंगल्यावर गेले होते. पण कोरोनाचे कारण सांगत चव्हाण यांनी निवेदन घेण्यास नकार दिला. त्यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी बंगल्याच्या दारातच घोषणाबाजी सुरू केली. म्हणून पोलिसांनी समन्वयकांना अटक करून पोलीस ठाण्यात नेले.

याचबरोबर मराठा आरक्षणाचा विषय दीड वर्षात सर्वोच्च न्यायालयासमोर आलेला नाही. राज्य सरकारने दाखल केलेल्या पुनर्विचार याचिकेवर निर्णय झालेला नाही, भोसले समितीच्या शिफारशी राज्य मागास वर्ग आयोगाकडे पाठविण्यात आलेल्या नाही. राज्य मागास आयोगावर दोन मराठा सदस्य घेण्याची मागणीही पूर्ण केलेली नाही, कोपर्डी खटला उच्च न्यायालयात दाखल करतो असे चव्हाण म्हणाले होते. मात्र त्या प्रकरणात काहीही हालचाल नाही. त्यामुळे आठ दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अशोक चव्हाण यांना फोन करून मराठा क्रांती मोर्चाच्या मागण्यांबाबत माहिती दिली होती. तरीही चव्हाण यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने मंत्री चव्हाण यांच्या शासकीय बंगल्यावर समन्वयक गेले होते. परंतु, त्यांनी निवेदन स्वीकारले नाही. या घटनेचा नगर जिल्हाध्यक्ष शिवाजी डौले, उत्तर जिल्हाध्यक्ष रावसाहेब दळवी, संयुक्त सरचिटणीस रमेश बोरुडे, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र काळे, युवक जिल्हाध्यक्ष ओमप्रकाश काळे, अकोले तालुकाध्यक्ष भानुदास गायकर, संगमनेरचे प्रकाश हासे, राहुरी तालुकाध्यक्ष अतुल तनपुरे, शहराध्यक्ष प्रदीप भुजाडी, जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण डांगे, महिला जिल्हाध्यक्षा दुर्गा थोरात, अकोले सरचिटणीस अशोक आवारी, सुशांत वाकचौरे, अक्षय आभाळे, अमोल मोरे आदिंनी केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *