नेवासा शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडले ठेकेदारावर कारवाई करण्याची भाजपची मुख्याधिकार्‍यांकडे मागणी

नायक वृत्तसेवा, नेवासा
डिझेल अभावी कचरा गाड्या उभ्या असल्याने नेवासा शहरातील कचरा व्यवस्थापन कोलमडले आहे. कचरा व्यवस्थापनासाठी ठेका घेतलेला ठेकेदारच यास कारणीभूत असल्याने या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष मनोज पारखे यांनी नगरपंचायतचे मुख्याधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुख्याधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात मनोज पारखे यांनी म्हटले आहे की, नेवासा नगरपंचायतीने शहरातील कचरा व्यवस्थापनासाठी कोट्यावधी रुपयांचा ठेका देऊनही संबंधित ठेकेदार नगरपंचायतच्या नियमावलीनुसार कचरा व्यवस्थापन करत नसल्याचे आढळून आले आहे. त्याचप्रमाणे नगरपंचायतीने ठेकेदाराला वेळोवेळी सूचना देऊनही कामामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मागील काळात संपूर्ण कामाची बिले ठेकेदाराला अदा करण्यात आली आहेत. उपनगरातील प्रभाग क्रमांक 5, 6, 7, 17, 16 मध्ये कचरागाडीही जात नाही. आता सुद्धा गेल्या 4 ते 5 दिवसांपासून कचरागाड्या डिझेल अभावी उभ्या आहेत. त्यामुळे नेवासकरांच्या घरी कचरा साठला असून आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

याप्रश्नी मुख्याधिकार्‍यांनी त्वरीत लक्ष घालून हा प्रश्न निकाली काढावा व संबंधित ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची कारवाई करावी. अन्यथा भारतीय जनता पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर भाजप शहराध्यक्ष मनोज पारखे, माजी सरपंच सतीष गायके, गटनेते सचिन नागपुरे, रोहित पवार, अजित नरुला यांच्या सह्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *