अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍या दोघांना दहा वर्षांची सक्तमजुरी! अकोल्यातील घटना; संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोल्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेवून अहमदनगरमधील एका शाळेच्या खोलीत तिच्यावर आळीपाळीने बलात्कार करण्याच्या प्रकरणातील दोघांना दहा वर्ष सक्तमजुरीसह 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 2016 साली घडलेल्या या प्रकरणाचा तपास अकोले पोलिसांनी केला होता. या प्रकरणी श्रीरामपूर व अहमदनगर येथील दोघांवर आरोपपत्र दाखल करुन त्यांच्यावर खटला चालविण्यात आला. सरकारी पक्षाने सादर केलेल पुरावे, साक्षीदार व जोरदार युक्तीवाद मान्य करीत संगमनेरचे जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी दोन्ही आरोपींना दोषी ठरवताना त्यांना प्रत्येकी दहा वर्ष सक्तमजुरी व 20 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

10 सप्टेंबर, 2016 साली अकोले येथील अल्पवयीन पीडितेला आरोपी मनीष उर्फ मॅडी उर्फ मनोज दगडू अहिरे याने पळवून नेल्याबाबत तिच्या वडिलांनी अकोले पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानुसार संशयिताविरोधात भा. दं. वि. कलम 363 नुसार अपहरणाचा गुन्हा दाखल करुन अकोले पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. सुरुवातीला या प्रकरणाचा तपास पोहेकॉ.शिवाजी भांगरे यांच्याकडे देण्यात आला होता. मात्र त्यानंतर गुन्ह्याचे गांभीर्य वाढल्याने त्यांच्याकडून तपास काढून अकोल्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक आर.जी.बर्डे यांच्याकडे तो सोपविण्यात आला. या दरम्यान पीडित मुलगी शिर्डी पोलीस ठाण्यात हजर झाली. त्याबाबतची माहिती प्राप्त होताच तपासी अधिकारी उपनिरीक्षक बर्डे यांनी पीडितेच्या आई-वडिलांसह शिर्डीत जावून तिला ताब्यात घेत अकोले गाठले.

सदर पीडितेला अकोले पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पोलिसांनी तिचा जवाब नोंदविला. त्यात तिने आरोपी मनीष उर्फ मॅडी उर्फ मनोज दगडू अहिरे (रा.खंडाळा, ता.श्रीरामपूर) याने आपणास पुणे येथून पळवून नेले व शिक्रापूर (जि.पुणे) येथे दुचाकीवरुन घेवून गेला. तिथे गेल्यावर आरोपीचा मित्र प्रवीण रघुनाथ शेवाळे (रा.वडगाव गुप्ता, ता.नगर) हा मारुती ओमिनी हे वाहन घेवून आला. त्यानंतर त्या दोघांनीही पीडितेस त्या वाहनात बसवून त्या दोघांनीही अहमदनगरमधील एका बंद असलेल्या शाळेच्या स्टाफ रुममध्ये नेले. तेथे आरोपी आहिरे याने तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला, त्यानंतर त्याचा मित्र शेवाळे यानेही तिच्यावर बळजबरीने शारीरिक अत्याचार केले.

या प्रकरणाचा सखोल तपास करुन तपासी अधिकारी, उपनिरीक्षक आर.जी.बर्डे यांनी सखोल तपास करुन दोन्ही आरोपींच्या विरोधात भा. दं. वि.कलम 376 (2)(।), 363, 342 व बाल लैगिंक अत्याचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम 4 अन्वये आरोपींविरोधात संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या खटल्याची सुनावणी जिल्हा व सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांच्यासमोर चालली. सरकार पक्षाकडून बाजू मांडताना सरकारी वकील बी. जी. कोल्हे यांनी सादर केलेले प्रबळ साक्षी-पुरावे व जोरदार युक्तीवाद, सहा साक्षीदारांच्या साक्षी, पीडितेने न्यायालयासमोर दिलेला जवाब, पीडितेच्या जन्म दाखल्याबाबत ठाणे महापालिकेचे अधिकारी विनय पाटील व तपासी अधिकारी आर. जी. बर्डे यांनी दिलेली साक्ष महत्वाची ठरली.

या सर्व बाबी ग्राह्य धरुन न्यायालयाने दोन्ही आरोपींना भा. दं. वि. कलम 372 (2)(।) नुसार 10 वर्ष सक्तमजुरी व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास दहा महिन्यांची साधी कैद, कलम 363 नुसार 3 वर्ष सक्तमजुरी व 3 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने साधी कैद, कलम 342 नुसार एका वर्षाची सक्तमजुरी, तसेच पोस्को कायद्याच्या कलम 4 नुसार 7 वर्षांची सक्तमजुरी व सात हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. या सर्व शिक्षा एकत्रित भोगण्याचे आदेशही न्यायालयाने दिले. सदर खटल्यात सरकारी पक्षाकडून पैरवी अधिकारी म्हणून पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रवीण डावरे, सहाय्यक फौजदार सुनील सरोदे, सुरेश टकले, महिला पोलीस कर्मचारी दीपाली दवंगे, सारिका डोंगरे, स्वाती नाईकवाडी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *