नववर्षाच्या स्वागतानिमित्त साईनगरीत चोख बंदोबस्त संभाव्य गर्दीच्या पार्श्वभूमीवर भाविकांना ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना

नायक वृत्तसेवा, शिर्डी
श्री साईबाबा संस्थानच्यावतीने चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी भाविकांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून शहरात व साईमंदिर परिसरात गर्दी नियंत्रणासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याकरीता अतिरिक्त पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत.


दरवर्षी नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी व कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्य शासनाच्या 24 डिसेंबर, 2021 च्या आदेशानुसार रात्री 9 ते सकाळी 6 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आलेले आहे. तसेच 31 डिसेंबर रोजी रात्री साईभक्तांची व ग्रामस्थांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता असल्याने संस्थानच्यावतीने भाविकांना ध्वनीक्षेपकाद्वारे सूचना देण्यात आलेल्या आहेत.

तसेच रात्री 9 वाजेनंतर श्री साईबाबा मंदिरातील आतील बाजू व मंदिर गाभारा यामध्ये साईभक्तांना प्रवेश दिला जाणार नाही. संस्थानच्या संरक्षण विभागामार्फत मंदिराचे सर्व प्रवेशद्वारांवर संरक्षण अधिकारी यांनी सुरक्षा अधिकारी, सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा रक्षकामार्फत परिसरात पेट्रोलिंग व महाद्वार याठिकाणी जमाव होणार नाही, त्याकामी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. तसेच संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी पोलीस अधीक्षकांशी मंदिर बंदोबस्तकामी पोलीस अधिकारी व अंमलदार यांची मागणी करण्यात आलेली होती. त्याप्रमाणे पोलीस विभागामार्फत बाहेरील पोलीस ठाण्यांचे 24 अधिकारी व 310 पोलीस अंमलदार (महिला 60 व 250 पुरुष) शिर्डी विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांच्या नियंत्रणाखाली बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. शिर्डी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील व शहर वाहतूक शाखेचे पोलीस यांच्यासह शिर्डी शहरात व मंदिर परिसरात लोकांचा जमाव होणार नाही, याबाबत दक्षता ठेवलेली असून भाविकांनी द्वारकामाई समोरील खुले नाट्यगृह परिसर, चावडी समोरील परिसर व मंदिर प्रवेशद्वार आदी ठिकाणी गर्दी करु नये. तसेच साईभक्तांनी व ग्रामस्थांनी याबाबत संस्थानला सहकार्य करावे, असे आवाहन श्री साईबाबा संस्थानच्यावतीने करण्यात आलेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *