गैरवर्तन करणार्‍यांविरोधात होणार कठोर कारवाई ः पाटील जिल्ह्यात थर्टी फर्स्टच्या पार्श्वभूमीवर 800 पोलिसांचा बंदोबस्त

नायक वृत्तसेवा, नगर
सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत सर्वत्र जल्लोषात केले जात आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन नागरिकांनी कोरोना नियमांचे पालन करावे. या पार्श्वभूमीवर 800 पोलीस अधिकारी-कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन व गैरवर्तन करणार्‍यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला. पत्रकार परिषद घेऊन थर्टी फर्स्ट आणि नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरील पोलीस बंदोबस्ताची माहिती त्यांनी दिली.

यावेळी पुढे बोलताना पोलीस अधीक्षक पाटील म्हणाले, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. ओमिक्रॉनचा वाढलेला धोका, यामुळे सरकारने नागरिकांवर काही निर्बंध घातले आहेत. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. 31) थर्टी फर्स्ट आणि शनिवारी (ता.1) नववर्षाच्या स्वागत सोहळ्यांसाठी राज्य सरकारने नवी नियमावली लागू केली आहे. अधीक्षक पाटील म्हणाले, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जे नियम लागू केले आहेत, त्या नियमांचे जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी पालन करावे. सरत्या वर्षाला निरोप देताना मोठ्या प्रमाणात गर्दी करू नये, पार्ट्या करणे, रात्री-अपरात्री नियमबाह्य पद्धतीने फटाके वाजवणे या सर्वांवर निर्बंध लावण्यात आले आहे.

नागरिकांनी सर्व नियमांचे पालन करूनच सरत्या वर्षाला निरोप द्यावा व नवीन वर्षाचे स्वागत करावे. नवीन वर्षाची सुरूवात चांगल्या पद्धतीने व्हावी. कोरोनाचा प्रार्दुभाव पसरणार नाही, याची काळजी घ्यावी. दरम्यान, सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होण्याची शक्यता असल्याने यावर पोलिसांची नजर असणार आहे. पार्ट्या करणे, गर्दी जमवणे किंवा रात्रीच्यावेळी दारू पिऊन वेगात वाहने चालविणे यावर पोलीस लक्ष ठेवणार आहेत. आज थर्टी फर्स्टच्या दिवशी पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे.

दारु पिणार्‍यांवर होणार कारवाई..
रात्रीच्या वेळेस दारु पिऊन वाहने चालविणे, वेगात वाहने चालविणे, इतर लोकांना त्रास होईल अशा पध्दतीने गैरवर्तन करणार्‍यांवर पोलिसांचे विशेष लक्ष राहणार आहे. शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलिसही रस्त्यांवर तैनात राहणार आहेत. त्यांच्याकडूनही कारवाई केली जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *