महामार्ग ओलांडताना वाहनाच्या धडकेत तरसाचा मृत्यू! आणखी किती वन्यजीवांना गमावणार; वन्यप्रेमींचा सवाल..

नायक वृत्तसेवा, घारगाव
अत्यंत वर्दळ असणारा पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग वन्य प्राण्यांसाठी डोकेदुखी ठरत असल्याचे अनेकदा समोर आलेले आहे. यापूर्वी महामार्ग ओलांडण्याच्या नादात अनेक बिबट्यांना जीव गमवावे लागल्याच्या घटना घडलेल्या आहेत. मंगळवारी (ता.30) पहाटे अशाच पद्धतीने महामार्गावरील माहुली (ता.संगमनेर) शिवारात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन वर्षांच्या तरस मादीचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महामार्ग ओलांडण्याच्या नादात आणखी किती वन्यजीवांचे प्राण घेणार असा सवाल वन्यजीवप्रेमींनी केला आहे.

याबाबत समजलेली अधिक माहिती अशी की, मंगळवारी पहाटे पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील माहुली शिवारात महामार्ग ओलांडण्याच्या नादात भरधाव वेगात असणार्‍या अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली. या धडकेत दोनवर्षीय तरस मादीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती समजताच वनपरिमंडल अधिकारी रामदास थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली वनसेवक बाळासाहेब वैराळ, दीपक वायाळ यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि त्यानंतर मृत तरसाला कोठे बुद्रुक येथील रोपवाटिकेत आणून अंत्यसंस्कार केले.

दरम्यान यापूर्वी महामार्ग ओलांडण्याच्या नादात घारगाव, डोळासणे, चंदनापुरी घाट आदी ठिकाणी अनेक बिबट्यांना आपले जीव गमवावे लागले आहेत. त्यानंतर वन विभागाने वरीष्ठ स्तरावर दखल घेऊन महामार्गाच्या खालून वन्यजीवांना ये-जा करण्यासाठी मार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, अद्याप यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही. याचबरोबर वन्यजीवांना जंगलात पाणी व भक्ष्य कमी पडल्यास ते मानवी वस्तीकडे कूच करतात. त्यामुळे वन विभागाने लवकरात लवकर ठोस उपाययोजना करणे गरजेचे आहे. तरच वन्यजीवांचे प्राण वाचवू शकतो असे वन्यजीवप्रेमींनी म्हटले आहे. तसेच वाहनचालकांनी देखील महामार्गावरुन वाहने चालविताना वन्यजीवांवर लक्ष ठेवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *