ज्येष्ठ शिवसैनिकांचे राजकीय भवितव्य ठरविणार्‍या निवडी! केसेकर केवळ प्रासंगिक सक्रीय होणार की झोकून काम करणार?

नायक वृत्तसेवा, संगमनेर
कधीकाळी मोठी ताकद असलेल्या शिवसेनेची शहरातून मागील दहा वर्षात मोठी पीछेहाट झाली आहे. आजची शिवसेना केवळ शहराच्या गावठाणात आणि मोजक्या लोकांच्या अवतीभोवती केंद्रीत झाल्यानेे राज्यात सत्ता असतांना चौफेर वाढीची संधी असूनही सेनेला फारसे काही साध्य करता आले नाही. पक्षाकडून यापूर्वीही सेनेतील जुन्या व निष्ठावान शिवसैनिकांचा नव्या पिढीशी समन्वय साधण्याचा प्रयत्न झाला, मात्र हा प्रयत्न केवळ पदे जाहीर करण्यापुरताच मर्यादीत राहील्याने त्यातून सेनेची अंतर्गत धुसफूस कमी होण्याऐवजी ती अधिक वाढली व त्यातून पक्षाची ताकदही क्षीण होत गेली. त्यामुळेच पक्षीय नेतृत्त्वाने पुन्हा एकदा हाच प्रयोग करुन संगमनेरातील दोघा ज्येष्ठ शिवसैनिकांचे स्थानिक ‘राजकीय वजन’ एकप्रकारे मान्य केले आहे. गेल्या पालिका निवडणूकीत तब्बल साडेनऊ हजार मते मिळविणार्‍या आप्पा केसेकर यांना उपजिल्हा प्रमुखपदानंतर आता दोन तालुक्यांच्या ‘मतदार संघ’ समन्वयकाची तर स्वबळावर दोन नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असलेल्या जयवंत पवार यांच्या सुपुत्रावर उपनगर प्रमुखाची जबाबदारी देण्यात आली आहे. या दोघांनी मिळून पक्षीय हितासाठी परिश्रम घेतल्यास शिवसेनेला गतवैभव प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही अशी सामान्य शिवसैनिकांची धारणा असली तरीही प्रत्यक्षात मागील अनुभव लक्षात घेता संगमनेरातील हे दोन्ही मातब्बर मिळालेल्या संधीला कसा न्याय देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सन 2016 सालची निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढविली होती. या निवडणूकीतून संगमनेर शहरातील सेना भाजपापेक्षा खूप बलवान असल्याचेही दिसून आले होते. प्रत्यक्षात मात्र यातील निम्म्याहून अधिक मते पक्षामुळे नव्हेतर उमेदवारामुळे प्राप्त झाल्याचेही त्यावेळी स्पष्ट झाले होते. शिवसेनेच्या पक्षप्रमुखांनी हाच मुद्दा विचारात घेवून नव्या नियुक्त्या केल्याचेही आता समोर येवू लागले आहे. खरेतर मागील निवडणूकीत पक्षाला आपली ताकद दाखविणार्‍या आप्पा केसेकर यांना उपजिल्हा प्रमुखाची जबाबदारी मिळाल्यानंतर त्यांच्याकडून संघटना बांधणीच्या अनुषंगाने काम होणे अपेक्षित होते. या काळात त्यांनी तालुका व शहर प्रमुखांसह युवासेना, कामगार सेना, महिला आघाडीसह गट, गण व बुथप्रमुख, विभाग व शाखाप्रमुख यांच्यात समन्वय निर्माण करुन पक्षाची ताकद वाढवण्याची गरज होती. प्रत्यक्षात मात्र एकाच बाजूला झुकलेल्या शहर व तालुक्यातील संघटनात्मक बांधणीने त्यांना प्रवाहात येण्यात अडथळे निर्माण केल्याने मतदारांनी डोक्यावर घेवूनही ते राजकारणात फारसे सक्रीय होवू शकले नाहीत.

स्थानिक राजकारणासह शिवसेनेच्या पक्षीय नेतृत्त्वाकडूनही संगमनेरातील निष्ठावानांवर अन्याय झाल्याची असंख्य उदाहरणे आहेत. आजच्या स्थितीत उत्तर नगर जिल्ह्यात शिवसेना रुजविणार्‍यांमधील फार कमी हाडाचे शिवसैनिक राहिले आहेत. त्या यादीत अग्रभागी असलेल्या आप्पा केसेकर यांना यापूर्वीच जिल्हा प्रमुखपद मिळायला हवे होते. मात्र पक्षाने त्यांच्या समर्पणाकडे नेहमीच दुर्लक्ष केल्याने जनतेच्या मनात स्थान निर्माण करुनही केसेकरांसारख्या अनेक जुन्या शिवसैनिकांना काळोखात जावे लागले. या स्थितीला केवळ स्थानिक राजकारणच नव्हेतर जिल्हा प्रमुखपदावर असलेल्यांचे दुर्लक्षही तितकेच कारणीभूत ठरले आहे. आता पक्षाने पुन्हा एकदा दोन ज्येष्ठांचे राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत असले तरीही यातून त्यांच्या पुनर्वसनापेक्षा स्थानिक पातळीवरील पक्षातील संभाव्य पडझड रोखण्याचाच प्रयत्न अधिक प्रबळ असल्याचे दिसून येत आहे.


या निवडीच्या निमित्ताने आगामी काळातील सर्व निवडणूकांत महत्त्वाची ठरणार्‍या ‘समन्वयका’ची जबाबदारी आप्पा केसेकर यांच्या खांद्यावर आली आहे. या पदाला शिवसेनेत मोठा मान असल्याचे बोलले जाते. या पदावरील व्यक्तिच्या विचाराशिवाय कोणत्याही निवडणूकीत पक्षाचे उमेदवार अंतिम होवू शकत नाहीत. त्याशिवाय शिवसेनेच्या पक्षरचनेनुसार शिवालयातील ‘समन्वयकाच्या’ माध्यमातून राज्यातील संपूर्ण पक्ष नियंत्रित ठेवला जातो. या समन्वयकांमध्ये केसेकर यांच्या काळात आमदारकी भूषविणार्‍या दगडूदादा सपकाळ, रवींद्र नेर्लेकर, प्रकाश वाघ, विश्वनाथ नेरुळकर अशा ज्येष्ठांचा समावेश आहे. केसेकर यांनी त्यांच्याशी योग्य संवाद ठेवला तर चित्र बदलण्याचीही शक्यता आहे. मात्र केसेकर या निवडीला किती महत्त्व देतात आणि पदरी पडलेल्या पदाची गरीमा कितपत सांभाळतात यावर त्यांचे राजकीय अस्तित्त्व ठरणार आहे.

दीर्घकाळ काँग्रेसमध्ये राहून स्वगृही परतलेल्या माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार यांचाही नव्या नियुक्त्यांमधून मान राखण्यात आला आहे. मात्र पक्षाने एकाचवेळी त्यांच्यावर संपूर्ण शहराची जबाबदारी न सोपविता आगामी निवडणुकीतील त्यांच्या प्रदर्शनापर्यंत आस्थे कदमची भूमिका स्वीकारली आहे. वास्तविक संगमनेर शिवसेनेची आजवरची ताकद गावठाण भागातच आहे. गेल्या दहा वर्षात सेनेला उपनगरात पक्षाचे विचार रुजविण्यात सपशेल अपयश मिळाले, यामागेही अंतर्गत राजकारणाची धुसफूस आहे. पक्षाने आता मात्र पवार यांच्या माध्यमातून उपनगरातील त्यांची राजकीय ताकद जोखण्याचाच प्रयत्न केला आहे. जयवंत पवार यांचे बंधु किशोर हे उपनगरातून तर त्यांची भावजय योगिता पवार या गावठाणातून काँग्रेसच्या तिकीटावर निवडून आल्या आहेत. अर्थात त्यांच्या विजयामागे काँग्रेसपेक्षा पवार ही ताकदच मोठी असल्याचे सर्वश्रृत आहे. त्यामुळेच शिवसेनेने अर्ध्या शहराची जबाबदारी देवून त्यांची राजकीय ताकद पक्षासाठी मिळविण्याचा प्रयत्न केला आहे.

संगमनेरच्या उपनगरात जातीय गणितंही महत्त्वाची ठरणार आहेत. पवार हे अल्पसंख्याक समजल्या जाणार्‍या क्षत्रिय समाजाचे आहेत, उपनगरात मात्र मराठा आणि माळी समाजाचे अधिक प्राबल्य आहे. अशा स्थितीत आपली राजकीय ताकद पणाला लावून ते या समाजातील मातब्बर अथवा सक्षम उमेदवार मिळविण्यात व त्यांच्या गळ्यात विजयाची माळ घालण्यात यशस्वी होतात का हे पाहणं औत्सुक्याचे ठरणार आहे. आपली राजकीय व आर्थिक ताकद लावून पवारांनी यापूर्वी उपनगरात कधीही यश न मिळणार्‍या सेनेच्या खात्यात आनंद भरल्यास मातोश्री भेटीत त्यांनी केलेली मागणी पूर्ण होण्याचीही शक्यता नाकारता येणार नाही.
(समाप्त)


एकंदरीत आप्पा केसेकर आणि प्रसाद पवार यांच्या माध्यमातून जयवंत पवार या दोन्ही ज्येष्ठ शिवसैनिकांना पक्षाने राजकीय मैदाने खुली करुन दिली आहेत. पवारांना जिल्हा प्रमुखांनंतर पहिल्यांदाच संघटनात्मक पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. तर केसेकरांना गेल्यावेळच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसह उपजिल्हा प्रमुख आणि आता दोन तालुक्यांच्या विधानसभा मतदार संघाच्या समन्वयकाची जबाबदारी देण्यात आली आहे. केसेकरांचा गेल्या दहा वर्षातील राजकीय प्रवास लक्षात घेता ते केवळ प्रासंगिक सक्रीय झाल्याचे दिसले आहे. मात्र यावेळी मिळालेली जबाबदारी पक्षीय रचनेत अत्यंत महत्त्वाची आणि कर्तृत्त्व सिद्ध करण्याची असल्याने ते या पदाला कसा न्याय देतात यावरच त्यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे हे निश्चित.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *