अकोले तालुक्यात एकाच दिवशी चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू राजूर येथील दोन सख्ख्या भावांसह मान्हेरे येथील मायलेकरावर काळाचा घाला

नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील दोन सख्खे भाऊ आणि माय-लेकराचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी चौघांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण तालुक्यात दुःखाचे वातावरण पसरले. एक घटना निळवंडे धरणात घडली, तर दुसरी घटना आदिवासी पट्ट्यातील मान्हेरे येथील एका विहिरीत घडली.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, निळवंडे जलाशयात अंघोळीसाठी गेलेल्या दोन भावंडांचा बुडून मृत्यू झाला. राजूर येथील समीर शांताराम पवार (वय 14) व सोहम शांताराम पवार (वय 11) या दोन सख्ख्या भावंडांवर काळाने घाला घातला. रविवारी (ता.28) सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली. राजूर येथील ही भावंडे आपल्या मुंबई येथील नातेवाईकांसोबत फिरण्यासाठी निळवंडे जलाशयावर गेली होती. तेथे पाणी पाहून त्यांना अंघोळीचा मोह आवरला नाही. समीर व सोहम धरणाजवळील पुलाच्या खाली अंघोळीसाठी पाण्यात उतरले. लाटेमुळे आत खेचले गेले. भोवरा तयार झाल्याने ते बुडाले. त्यांचे नातेवाईक आकाश जाधव व अर्जुन गायकवाड यांनी ही माहिती मुलांच्या वडिलांना कळविली. त्यानंतर नातेवाईक जमा झाले.

स्थानिक मच्छीमार सोमनाथ मेंगाळ यांनी सायंकाळी नदीपात्रात मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. रात्री उशिरा समीरचा मृतदेह सापडला. तर सोमवारी (ता.29) सकाळी सोहमचा मृतदेह आढळून आला. अकोले पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पंचनामा केला. अकोले ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. राजूर येथील श्री स्वामी समर्थ माध्यमिक विद्यालयात समीर हा नववीत व सोहम सहावीत शिकत होता. घटनेची माहिती समजताच शिक्षक व विद्यार्थ्यांवर शोककळा पसरली.

तर तालुक्यातील आदिवासी भागातील मान्हेरे येथील एका शेतातील विहिरीत बुडून माय-लेकराचा मृत्यू झाला. गंगूबाई यशवंत गभाले (वय 31) व त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर (वय 5) अशी या माय-लेकरांची नावे आहेत. या घटनेची माहिती राजूर येथील देशमुखवाडीचे मारुती गोगा देशमुख यांनी राजूर पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी हजर झाले, पण विहिरीत खूप पाणी असल्यामुळे मृतदेह बाहेर काढणे अवघड झाले. दोन विद्युतपंपांच्या साहाय्याने पाणी उपसल्यावर, दुपारनंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले. राजूर येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक तपासणी करून प्रवरानगर रुग्णालयात मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. ही आत्महत्या आहे की घातपात, हे शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावर समजणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. दरम्यान दोन्ही घटनांनी अकोले तालुका हादरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *