अंभोरे येथील खून प्रकरणी तिघांना जन्मठेपेची शिक्षा! संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील अंभोरे येथे 8 मार्च, 2017 रोजी झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा खून झाला होता. या प्रकरणाचा निकाल संगमनेर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. वाय. भोसले यांनी सोमवारी (ता.29) दिला असून, यातील तीन आरोपींना दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, अंभोरे शिवारात 8 मार्च, 2017 रोजी संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास दुपारी झालेल्या भांडणाचा जाब विचारण्याच्या कारणावरुन जोरदार भांडण झाले. यावेळी गोविंद साळपाटील खेमनर, संपत गागरे (पूर्ण नाव माहीत नाही रा.कोळवाडे) व दोघे अनोळखी तरुणांनी आपसांत संगनमत करुन स्वीफ्ट कारमधून येऊन संपत गागरे व दोघा अनोळखी तरुणांनी स्वप्नील शिवाजी पुणेकर या तरुणास धरुन गोविंद खेमनर याने त्याच्या हातातील चाकूने स्वप्नीलच्या पोटावर वार केले. तसेच विनायक साळबा पुणेकर, भाऊसाहेब पुणेकर व शिवाजी केरु पुणेकर यांच्यावरही चाकूने वार करीत गंभीर जखमी करुन कार अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

यातील स्वप्नील पुणेकर यास तत्काळ संगमनेर शहरातील खासगी रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे हलविले. परंतु, तेथील डॉक्टरांनी तपासणी करुन तो मयत असल्याचे सांगितले. या प्रकरणी तान्हाजी साळबा पुणेकर यांनी तालुका पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी वरील आरोपींविरोधात गुरनं.36/2021 भादंवि कलम 302, 307, 324, 323, 34 नुसार गुन्हा दाखल केला होता. या घटनेचा तपास तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी अजय देवरे यांनी केला. सदर खटला येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयात सुमारे पाच वर्ष चालला. अखेर सबळ पुराव्यांच्या आधारे आरोपींना दोषी ठरवून न्यायाधीश एस. वाय. भोसले यांनी गोविंद साळपाटील खेमनर (वय 24, रा.अंभोरे), संपत उर्फ प्रशांत शांताराम गागरे (वय 25, रा.कोळवाडे) व विशाल उर्फ छोटू हौशीराम खेमनर (वय 23, रा.अंभोरे) या तिघांना खून प्रकरणी जन्मठेप व पाच हजारांचा दंड, मारहाण प्रकरणी दोन हजारांचा दंड व तीन महिने कैद, तसेच एक हजारांचा दंड व दोन महिने कैद अशी शिक्षा सुनावली आहे. सदर खटल्यासाठी सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. संजय वाकचौरे यांनी काम पाहिले. तर पैरवी अधिकारी म्हणून पोकॉ.वाघ यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *