नुकसान टाळण्यासाठी सेनेकडून नवपदाधिकार्‍यांची नियुक्ती! केसेकरांच्या रुपाने जुन्या-नव्यांचा मेळ साधण्याचा प्रयत्न; कतारींचे मात्र पंख छाटले..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अहमदनगर शहरप्रमुखपदाच्या नियुक्तिबाबत जिल्ह्यात चर्चा सुरु असतांना शिवसेनेकडून अनपेक्षितपणे नगरसह संगमनेरातील पक्षीय रचनेतही फेरबदल करण्यात आले आहेत. त्यातून दोन दशकांपूर्वी शिवसेनेला राजकीय सुवर्णकाळ दाखविणार्‍या दोघा ज्येष्ठांचे पुनर्वसनही करण्यात आले आहे. या फेररचनेतून गेल्या पालिका निवडणुकीत पक्षाला भरघोस मते मिळवून देणार्‍या आप्पा केसेकर यांना दोन मतदारसंघांचे समन्वयक घोषित करुन स्थानिक शिवसेनेतील त्यांचे महत्त्व अधोरेखीत करण्यासह माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार यांचे सुपूत्र प्रसाद यांना दक्षिण शहरप्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांच्या निवडीतून पक्षाने एकप्रकारे विद्यमान शहरप्रमुख अमर कतारी यांचे पंख छाटल्याचेही दिसत असून आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंतर्गत गटबाजीतून पक्षाचे राजकीय नुकसान टाळण्यासाठी या नियुक्त्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

निवडणुकांच्या तोंडावर शक्यतो पदाधिकार्‍यांची निवड टाळली जाते असा राजकीय पक्षांचा अलिखित प्रघात आहे. संगमनेर शहर मात्र त्याला अपवाद ठरले आहे. शिवसेनेच्या परंपरेनुसार राज्यातील कोणत्याही ठिकाणच्या पदाधिकार्‍यांची निवड पक्षप्रमुखांच्या आदेशाने झाल्यानंतर त्याबाबतची अधिकृत माहिती शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना दैनिकातून प्रसिद्ध केली जाते. त्यानुसार रविवारी (ता.28) रिक्त असलेल्या अहमदनगर शहरप्रमुखांच्या नियुक्तीसोबतच संगमनेर शिवसेनेच्या पक्षीय रचनेतही बदल करण्यात आले. या बदलातून 1990 ते 2000 या दशकांत शहर शिवसेनेला सुवर्णकाळ दाखवणार्‍या निष्ठावान शिवसैनिकांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले आहे. मात्र त्याचवेळी यापूर्वी संगमनेर-अकोल्यात अस्तित्त्वातच नसलेले ‘मतदारसंघ समन्वयक’ हे पद निर्माण करुन एकप्रकारे तिकीट वाटपाच्या अधिकारांचे ‘विकेंद्रीकरण’ही करण्यात आले आहे.

संगमनेर शिवसेनेच्या निष्ठावानांच्या यादीत माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार आणि माजी उपजिल्हाप्रमुख आप्पा केसेकर यांचे महत्त्व सर्वश्रृत आहे. मात्र 2000 साला नंतर संगमनेरातील राजकीय परिस्थितीत मोठी उलथापालथ होवून कधीकाळी शिवसेना रुजविणारे सैनिक कालानुरुप मागे पडत गेले आणि नवीन पिढीने शहर व तालुक्याचे नेतृत्त्व मिळवून आपल्या परीने पक्ष बळकट करण्याची कवायत सुरु केली. या दरम्यानच्या काळात जयवंत पवार यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला, तर केसेकर एकप्रकारे विजनवासात गेले होते. काँग्रेसवासी झालेल्या पवार यांची तेथे घुसमट झाल्यानंतर ते स्वगृही परतले आणि मागील विधानसभा निवडणूकीत संगमनेर मतदार संघातून त्यांनी तिकीट मिळविण्यासाठीही धडपड केली. मात्र त्यात त्यांना अपयश मिळाल्यानंतरही ते पक्षातच राहिले. या कालावधीत त्यांनी आपला मुलगा प्रसाद याला सक्रीय करुन त्याला शहरप्रमुखपदाची जबाबदारी मिळविण्याचाही प्रयत्न केला.

2016 साली झालेल्या पालिकेच्या निवडणूकीत भारतीय जनता पाटी व शिवसेनेतील युतीबाबत शेवटच्या क्षणापर्यंत निर्णय न झाल्याने या दोन्ही पक्षांनी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह शहरातील प्रभागांमध्ये आपापले उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरवले होते. त्या निवडणुकीत जवळपास 15 वर्ष सक्रीय राजकारणातून गायब झालेल्या कैलास उर्फ आप्पा केसेकर यांना पक्षाने नगराध्यक्षपदाचा उमेदवार घोषित करुन शिवसेनेने त्यांच्या पक्षावरील निष्ठेचा सन्मान केला. इतका प्रदीर्घकाळ निष्क्रिय असूनही केसेकर यांनी जीवाचे रान करीत दूरावलेल्या शिवसैनिकांना पुन्हा पक्षाकडे वळवण्यासह सत्ताधारी गटातील उमेदवाराला कडवी झुंज देत तब्बल साडेनऊ हजार मते मिळविली, मात्र ते विजयापासून खूप दूर राहिले. त्यानंतरही पक्षाने त्यांच्यावर विश्वास ठेवतांना त्यांना संघटनात्मक कामात उपजिल्हा प्रमुखपदाची जबाबदारी दिली. मात्र गेल्या निवडणुकीनंतरच्या काळात पक्षाला जुने-नवे समीकरण बसविण्यात अपयश आल्याने केसेकर पुन्हा एकदा विजनवासात गेले.

दुसरीकडे स्वगृही परतलेल्या जयवंत पवार यांनी 2019 सालच्या निवडणूकीत विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी थेट ‘मातोश्री’वरही वार्‍या केल्या. मात्र त्यांच्यावर त्यावेळी आयारामाचा शिक्का असल्याने पक्षाने उद्योजक साहेबराव नवले यांच्यावर विश्वास दाखविला. त्यानंतरच्या कालावधीत पवार यांनी पक्षातच राहून आपला मुलगा प्रसाद याला सक्रीय केले व वेळोवेळी पक्ष नेतृत्त्वासह वरीष्ठांच्या भेटीत त्याचे नाव पुढे करुन शहर प्रमुखपदाची मागणीही रेटली. त्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्याबाबतीत घडला आणि रविवारी अकस्मातपणे प्रसाद पवार यांना अर्ध्या शहराची जबाबदारी देण्यात आली. या नियुक्तीच्या निमित्ताने जयवंत पवार यांचेही राजकीय पुनर्वसन झाल्याचे समजले जाते. वरकरणी केवळ पुनर्वसनासाठी शहराचे पुन्हा एकदा दोन भाग झाल्याचे दिसत असले तरीही त्यामागे मात्र पाच वर्षांपूर्वी घडलेला प्रसंगच दडलेला असल्याचेही यानिमित्ताने समोर आले. त्यामुळे प्रसाद पवार यांच्या निवडीतून त्यांनी नेमके काय मिळविले हे येणारा काळ ठरविणार असला तरीही या निमित्ताने उमेदवारीच्या तिकीट वाटपावर विद्यमान शहरप्रमुख अमर कतारी यांचा असलेला वरचष्मा कमकुवत करण्याचाच अधिक प्रयत्न झाल्याचे दिसत असल्याने एकप्रकारे त्यांचे पंख छाटण्याचीच किमया पक्षाने साधल्याचे बोलले जात आहे.

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर शाई फेकण्याचा प्रताप करण्यासह विद्यमान महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणार्‍या भाऊसाहेब हासे यांचाही विचार पक्षाने केला. पक्षावरील त्यांची निष्ठा विचारात घेत पक्षप्रमुखांनी त्यांची उपजिल्हा प्रमुखपदावर निवड केली आहे. अर्थात संघटन मजबुत करण्यासाठी निर्माण करण्यात आलेल्या या पदावर ते किती प्रभावी पद्धतीने काम करतात व पक्षाला त्याचा फायदा मिळवून देतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. एकंदरीत अपेक्षित नसतांना शिवसेना पक्षाकडून अचानक करण्यात आलेली ही पक्षीय फेररचना वरकरणी आगामी निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर झाल्याचे भासत असले तरीही त्यामागे गेल्याकाही वर्षात पक्षातंर्गत निर्माण झालेली गटबाजी, जुन्या आणि नव्या शिवसैनिकातील दूरावलेला संवाद पुन्हा स्थापित करण्याचा आणि त्यातून आगामी निवडणूकांमध्ये ‘स्वबळावर’ लढण्याची वेळ आली तरीही होणारे संभाव्य नुकसान टाळण्याचाच प्रयत्न झाल्याचे दिसून येत आहे.
(पूर्वाध)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *