वाशेरे येथील अझोला लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षणास उत्स्फूर्त प्रतिसाद महाराष्ट्र शासन आणि बायफ संस्थेचा उपक्रम; महिलांचा लक्षणीय सहभाग

नायक वृत्तसेवा, अकोले
राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग महाराष्ट्र शासन पुरस्कृत व बायफ संस्था संचलित अझोला लागवड तंत्रज्ञान प्रकल्पांतर्गत अकोले तालुक्यातील वाशेरे येथे नुकतेच तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले.
यावेळी पद्मश्री बीजमाता राहीबाई पोपेरे, अन्नमाता ममताबाई भांगरे, तहसीलदार सतीश थेटे, ज्येष्ठ पत्रकार शांताराम गजे, मंडल कृषी अधिकारी राजाराम साबळे, कृषीतज्ज्ञ विजया गोरडे, मध्यवर्ती संशोधन केंद्र बायफचे डॉ. अविनाश देव, डॉ. सदानंद निंबाळकर, तरुण संशोधक व शास्त्रज्ञ दीपक पाटील, विभागीय अधिकारी जितीन साठे, ज्येष्ठ सेंद्रीय शेती तज्ज्ञ संपत वाकचौरे, प्रकल्प समन्वयक योगेश नवले आदी मान्यवर होते. कार्यक्रमाचे आयोजन मुंजेश्वर महिला स्वयंसहाय्यता समूह वाशेरे यांच्यावतीने करण्यात आले होते.

तहसीलदार थेटे मार्गदर्शन करताना म्हणाले, अकोले तालुका हा नैसर्गिकदृष्ट्या समृद्ध आणि अतिशय सुंदर आहे. त्याचप्रमाणे इथली माणसंही तितकीच सुंदर असल्याने त्यांचे कौतुक वाटते. पद्मश्री राहीबाई आणि फूडमदर ममताबाई यांच्यासारखे सामान्यातील असामान्य व्यक्तिमत्त्व या तालुक्याने जगाला दिल्याचे समाधान आहे. वेळ मिळाल्यानंतर या सर्वांना भेटण्यासाठी त्यांच्या गावी जाऊन येणार असल्याचे त्यांनी नमूद केले. ज्येष्ठ पशुवैद्यकीय शास्त्रज्ञ डॉक्टर अविनाश देव यांनी उपस्थितांना अझोला पिकाविषयी शास्त्रीय माहिती दिली. दूध वाढीसाठी व दुधाची फॅट वाढवण्यासाठी अझोला खाद्य दूध व्यावसायिकाच्या प्रत्येक घरी निर्माण झाले पाहिजे. अझोला खाद्य दुधाळ जनावरांना दिल्याने त्यांच्या शरीराची वाढ समतोल होते. तसेच जनावरांची रोगप्रतिकारक क्षमता मोठ्या प्रमाणावर वाढीस लागते. यासह दूध उत्पादन वाढण्यासही मदत होते. अझोला पावडर वाळवून त्याची पावडर तयार करून साठवता येते. प्रतिदिवस पूर्ण वाढ झालेल्या जनावरांना शंभर ते दीडशे ग्रॅम चार्‍यात मिक्स करून द्यावी. याचा फायदा जनावरांना नक्की होतो. दूध उत्पादकांसाठी अझोला लागवड वरदान ठरत आहे असे त्यांनी सांगितले.

ज्येष्ठ अभ्यासक डॉक्टर सदानंद निंबाळकर यांनी अझोला या चारा पिकातून उपलब्ध होणारे सूक्ष्म खनिजे व इतर पोषक घटक जसे प्रोटिन, लोह, जुना इत्यादी मोठ्या प्रमाणावर असल्याने जनावरांना ते खाऊ घातल्याने सुदृढ आरोग्य लाभते. दूध उत्पादनावर अझोला खाद्य नियमितपणे खाऊ घातल्याने सकारात्मक परिणाम दिसून येतात हे स्पष्ट केले. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर सत्रात अझोला खाद्यामध्ये सर्वात जास्त मिनो सीड व प्रोटिन (25 ते 28 टक्के) उपलब्ध असल्याची माहिती करून दिली. एवढ्या मोठ्या प्रमाणात खनिजसाठा इतर चारा पिकांमध्ये उपलब्ध होत नाही. त्यामुळे इतर चारा मोठ्या प्रमाणावर खाऊ घालूनही त्याचा दूध उत्पादनावर व जनावरांच्या वाढीवर विशेष परिणाम दिसून येत नाही. अझोला खाद्य अत्यंत कमी प्रमाणात खाऊ घालावे लागते. परंतु त्याचे परिणाम दूध उत्पादन आणि दर्जेदार दूध निर्मितीवर मोठ्या प्रमाणावर होत असतो असे सांगितले.

बीजमाता पद्मश्री पोपेरे म्हणाले, शेती हा उद्योग समजून शास्वत शेतीसाठी पशुधन व्यवस्थापन उत्तम दर्जाचे करावे असे आवाहन केले. वाशेरे हे गाव माझ्यासाठी पंढरपूर आहे. एकादशीच्या दिवशीच मी सुमारे दहा वर्षांपूर्वी बायफ संस्थेच्या मदतीने याच गावात सर्वप्रथम संपत वाकचौरे यांच्या घरी गांडूळ खत निर्मिती व सेंद्रीय शेतीचे प्रशिक्षण घेण्यासाठी आले होते. या जागेवरूनच मला सेंद्रीय शेतीचे मौलिक ज्ञान मिळाले आहे या आठवणीला उजाळा दिला. कृषी क्षेत्रातील राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या फूडमदर ममताबाई भांगरे यांनी आपला जीवन प्रवास उपस्थितांना उलगडून सांगितला. घराभोवती तयार केलेली परसबाग व सेंद्रीय शेतीचे केलेले प्रयोग देशपातळीवर बायफ या संस्थेचे मुळेच गेल्याचे त्यांनी नमूद केले. अझोला लागवडीमुळे दूध व्यवसायात झालेली प्रगती व होत असलेला फायदा याविषयी ढोकरी येथील प्रगतिशील शेतकरी बबन शेटे यांनी आपले अनुभव कथन केले. कार्यक्रमासाठी टाकळी ढोकरी, इंदोरी, गर्दणी, रुंभोडी, वाशेरे, परखतपूर येथील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला शेतकर्‍यांचा सहभाग व उपस्थिती लक्षणीय होती. प्रास्ताविक जितीन साठे यांनी केले तर सूत्रसंचालन संपत वाकचौरे आणि योगेश नवले यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *