‘महाविकास आघाडी’चे सत्तासूत्र स्थानिक निवडणुकांत टिकणार का? आगामी काळात होणार्‍या गावपातळ्यांवरील निवडणुकांच्या चर्चा रंगल्या..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आवश्यक मतदारांची पूर्तता होत नसल्याने जिल्ह्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून होणार्‍या विधान परिषद सदस्याची निवडणूक तूर्त टळली आहे. मात्र आगामी काळात गावपातळ्यांवर होणार्‍या बाजार समित्यांच्या निवडणुकांसह पुढील वर्षीच्या सुरुवातीपासूनच जिल्ह्यातील बहुतेक सर्वच नगरपालिकांच्या निवडणूका होणार असल्याने जिल्ह्यात राजकीय रंगरंगोटी सुरू झाली आहे. यंदाच्या राजकीय आखाड्याची स्थिती मात्र पूर्वीपेक्षा वेगळी असल्याने राज्यातील महाविकास आघाडी गावपातळीपर्यंत टिकून राहील का? याबाबत साशंकता आहे. कर्जत-जामखेडच्या दौर्‍यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महाविकास आघाडीला सत्ता देण्याचे आवाहन करुन या चर्चेला जागा करुन दिली असली तरीही एकहाती प्राबल्य असलेले मतदार संघ आघाडीच्या नावाने वाटले जातील का? हा खरा प्रश्न आहे.

आगामी कालावधीत जिल्ह्यातील बहुतेक बाजार समित्यांसह पुढील वर्षीच्या सुरुवातीला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील चार बाजार समित्यांच्या निवडणुकांचा पहिला टप्पा सुरू झाला असून या चारही बाजार समित्यांच्या प्रारुप मतदार याद्या जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यामुळे कर्जत, जामखेड, पारनेर व कोपरगाव येथील राजकीय वातावरण तापू लागले असून उमेदवारी मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. मात्र यापूर्वीची राजकीय स्थिती विचारात घेतल्यास जिल्ह्यातील बहुतेक बाजार समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर स्थानिक लोकप्रतिनिधींचे वर्चस्व आहे. त्यातही बहुतांशी समित्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचाच वरचष्मा असल्याने राज्यात काँग्रेस-सेना-राष्ट्रवादी असे जमलेले नवीन सूत्र या निवडणुकांमध्ये वापरले जाणार आहे का? हा संभ्रम आजही कायम असल्याने अनेक इच्छुकांनी ‘वेट अ‍ॅण्ड वॉचची’ भूमिका घेतली आहे.

वरील चारही बाजार समित्यांसह पुढील वर्षीच्या सुरुवातीला संगमनेर, अकोले, राहाता, श्रीरामपूर, पाथर्डी, नेवासा, शेवगाव व राहुरी या आठ बाजार समित्यांच्या निवडणुका होणार असल्याने या सर्व निवडणुकांचा कार्यक्रम किमान चार टप्प्यात होण्याचा अंदाज आहे. त्यासोबतच जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांचे पडघमही वाजले आहेत. काही ठिकाणच्या प्रभाग रचना आणि आरक्षण सोडतीही काढण्यात आल्या आहेत. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडी विरुद्ध भाजप असं चित्र असले तरीही त्याचे प्रतिबिंब आगामी काळातील बाजार समित्या व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांमध्ये दिसणार का असा प्रश्न आहे.

गावपातळीवर होणार्‍या अशा सर्वच निवडणुकांच्या माध्यमातून पक्षातील तळातल्या कार्यकर्त्यांचे पुनर्वसन होत असते. त्यामुळे तालुक्याचे नेतृत्त्व करणारी नेते मंडळी अशा निवडणुकांमध्ये राज्यातील सत्ताकारणाचे प्रतिबिंब उमटू देत नाहीत असाच आजवरचा इतिहास आहे. तसेच या निवडणूकांवर गावपातळीवरील व्यक्तिगत नाते संबंध, व्यवसाय, व्यवहार व निष्ठा यांचाच अधिक प्रभाव दिसत असल्याने राज्यातील महाविकासाचे सूत्र स्थानिक पातळीवर लागू होते का हा खरा प्रश्न आहे. राज्यातील बदललेल्या राजकीय परिस्थितीत कर्जत-जामखेडच्या दौर्‍यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ‘महाविकास आघाडी’च्या हाती सत्ता देण्याचे’ वक्तव्य प्रत्यक्ष निवडणुकांपर्यंत टिकते का हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *