सहकारमहर्षी थोरात कारखान्याचे काम इतरांसाठी दिशादर्शक ः गायकवाड साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सपत्नीक कारखान्याला भेट

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक, सभासद, कामगार या सर्वांचे हित जोपासताना केलेले काम हे इतर सर्व सहकारी साखर कारखान्यांसाठी दिशादर्शक असल्याचे गौरवोद्गार साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी काढले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याला साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी सपत्नीक भेट दिली यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, उपाध्यक्ष संतोष हासे, संचालक रमेश गुंजाळ, चंद्रकांत कडलग, भास्कर आरोटे, भाऊसाहेब शिंदे, डॉ. तुषार दिघे, संभाजी वाकचौरे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, किरण कानवडे, नवनाथ गडाख, रामदास तांबडे, भाऊसाहेब खर्डे आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना गायकवाड म्हणाले, स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी सहकार चळवळीचा पाया घातला आणि या चळवळीमुळे ग्रामीण भाग समृद्ध झाला. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर हा सहकार चालविला. त्याच मार्गदर्शन प्रणालीवर नामदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली याठिकाणी काम होत असून नव्याने केलेल्या पाच हजार पाचशे मेट्रीक टन कारखाना व तीस मेगावॅट वीजनिर्मितीचा प्रकल्प इतरांसाठी दिशादर्शक ठरला आहे. कारखान्याने नवीन इथेनॉल प्रकल्प व ऑक्सिजन प्लांटही सुरू केला आहे. पारदर्शकता, काटकसर व चांगले व्यवस्थापन यामुळे हा कारखाना कार्पोरेट सेक्टरप्रमाणे इतरांसाठी मार्गदर्शक ठरणारा आहे. प्रास्ताविक कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले तर उपाध्यक्ष संतोष हासे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *