संगमनेरच्या पूनम गुंजाळचा राज्यपालांच्या हस्ते गौरव एम. एसस्सी अ‍ॅग्रीमध्ये विशेष प्राविण्य मिळवत राहुरी कृषी विद्यापीठात प्रथम

नायक वृत्तसेवा, संगमनेर
तालुक्यातील रायते येथील पूनम बाळासाहेब गुंजाळ हिला राज्यपालांच्या हस्ते नुकतेच सुवर्णपदक मिळाले आहे. तिने एम. एसस्सी अ‍ॅग्रीमध्ये (अ‍ॅग्रोनॉमी) विशेष प्राविण्य मिळवत राहुरी कृषी विद्यापीठात प्रथम आली आहे. तर कनोली गावचे सुपुत्र चेतन शिंदे हा बी. एसस्सी अ‍ॅग्रीमध्ये सर्वाधिक गुण मिळवून (90 टक्के) प्रथम आल्यामुळे त्याचा देखील रौप्यपदक देऊन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी गौरव केला आहे.

राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठात पार पडलेल्या पदवीदान समारंभावेळी खासदार शरद पवार, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, कुलगुरु डॉ.प्रशांतकुमार पाटील आदी उपस्थित होते. पूनम हिने अत्यंत हालाखीच्या परिस्थितीत हे सुयश मिळविले आहे. त्यामुळे समाजातील इतर मुलींसमोर नवा आदर्श निर्माण झाला आहे. या यशामुळे संगमनेर तालुक्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. हा कार्यक्रम पार पडल्यानंतर पूनमचा रायते येथे नागरी सत्कार करण्यात आला. नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे यांनी देखील संगमनेरात तिचा सत्कार केला. अमृतेश्वर महाविद्यालयामध्ये नाशिक पदवीधरचे आमदार डॉ. सुधीर तांबे व संगमनेर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांनी देखील सत्कार केला.

संगमनेरच्या विद्यार्थ्यांनी कृषी क्षेत्रात यश मिळविल्याने महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी देखील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे. याचबरोबर इतर क्षेत्रातील सर्वच मान्यवरांनी तिच्यासह चेतन शिंदे याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.


बी. एसस्सी. अ‍ॅग्रीनंतर एम. एसस्सी. अ‍ॅग्री करण्याचा निर्णय घेतला. यामध्ये प्रा. ए. बी. मोहिते सरांनी मोलाचे मार्गदर्शन केले. खरेतर, आज जे यश मिळाले आहे यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आज यशाचे कौतुक सर्वत्र होत आहे. त्यामुळे डोळे पाणवले असले तरी ते मोत्यासारखे चमकतील.
– पूनम गुंजाळ (रायते)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *