आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ‘शिवसेना भवनात’ खलबतं! तालुकाप्रमुखांची कानउघडणी केल्याची चर्चा; कोणत्याही स्थितीत भाजपाशी युती नाहीच..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील महाविकास आघाडीच्या कारभारावर विरोधकांकडून आरोपांचे एकामागून एक हल्ले होत असताना, त्याकडे दुर्लक्ष करीत शिवसेनेने आगामी जिल्हा परिषदा, महापालिका आणि नगरपालिकांच्या निवडणुकांकडे लक्ष्य केंद्रीत केले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी संगमनेर शहर व तालुका शिवसेना प्रमुखांना शिवसेना भवनात पाचारण करण्यात आले होते. या बैठकीत गेल्या मोठ्या कालावधीपासून निष्क्रीय भूमिकेत असलेल्या तालुकाप्रमुखांची कानउघडणी झाल्याची चर्चा असून यापुढील कोणत्याही निवडणुकीत भाजपाशी कोणत्याही स्वरुपाची ‘युती’ होणार नसल्याचे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत. त्यामुळे येणार्‍या निवडणुकांमध्ये भाजपासोबत युती होण्याच्या शक्यतांना एकप्रकारे पूर्णविराम मिळाला आहे.

चालू वर्षाच्या शेवटी मुदत संपणार्‍या राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांची पूर्वतयारी सुरु झाली आहे. त्या अनुषंगाने निवडणूक आयोगाकडून आवश्यक असलेल्या प्रक्रियाही सुरु करण्यात आल्या आहेत. त्यातच सध्या राज्यातील काही मंत्र्यांवर विरोधकांकडून सातत्याने होत असलेले हल्ले आणि आर्यन खान प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालेले असताना शिवसेनेने मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत आगामी काळात होणार्‍या निवडणुकांची तयारी सुरु केली आहे. त्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता.28) राज्यातील सेनेच्या काही पदाधिकार्‍यांना मुंबईतील शिवसेना भवनावर पाचारण करण्यात आले होते. त्यात संगमनेर शहरप्रमुख अमर कतारी व तालुका प्रमुख जनार्दन आहेर यांचाही समावेश होता.

यावेळी संगमनेरातील पदाधिकार्‍यांशी चर्चा करताना शिवसेनेचे समन्वयक विश्वनाथ नेरुळकर यांनी तालुक्याच्या सद्यस्थितीची माहिती घेतल्यानंतर आगामी काळात होणार्‍या सर्व निवडणुकांमध्ये शिवसेनेची अधिकृत भूमिका या दोन्ही पदाधिकार्‍यांना सांगितली. त्यानुसार जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका व नगर पंचायतीच्या निवडणूकांची तयारी करतांना परिस्थितीनुरुप शक्य असेल तेथे राष्ट्रवादी काँग्रेस अथवा काँग्रेससोबत ‘घरोबा’ करण्याचे व तसे शक्य नसल्यास स्वबळावर लढण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. त्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत भारतीय जनता पार्टीसोबत उघड अथवा छुप्या स्वरुपाची युती केली जावू नये असेही बजावण्यात आल्याने राज्यातील आगामी निवडणुकांसह जिल्ह्यातील निवडणुकांमध्ये शिवसेना भारतीय जनता पार्टीपासून दूरच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या बैठकीनंतर तालुका शिवसेनेचे प्रमुख जनार्दन आहेर यांच्या निष्क्रीयतेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात आल्याची चर्चा कानावर आली आहे. याबाबत काही शिवसैनिकांनी त्यांच्या तक्रारीही केल्याचे समजते. भारतीय जनता पार्टीचे नेते, आमदार राधाकृष्ण विखे पाटील व ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांच्या विश्वासातील नेता अशीही आहेर यांची ओळख असल्याने व शिवसेना भवनात दाखल झालेल्या त्यांच्या विरोधातील तक्रारींचा सूरही तसाच असल्याने त्यांना मुंबई दरबारी हजर होण्यास बजावल्यानंतर काहींनी देव पाण्यात बुडवून ठेवले होते. प्रत्यक्षात मात्र आहेर यांच्या निष्क्रीयतेबाबत प्रश्न उपस्थित करुन त्यांना पुन्हा सक्रीय होण्याच्या व पक्षवाढीसाठी काम करण्याच्या सक्त सूचनांवरच त्यांच्या विरोधातील तक्रारींचा निपटारा करण्यात आल्याचीही चर्चा आहे. त्यामुळे येणार्‍या काळात नागरी प्रश्नांवरुन शिवसेना अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे.

राज्याच्या सत्ताकारणात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांनी एकत्र येवून सर्वाधीक जागा पटकावणार्‍या भाजपाला सत्तेच्या खुर्चीपासून दूर ठेवण्यात यश मिळविले. मात्र हाच फार्म्युला राज्यातील अन्य निवडणुकांमध्ये राबविला जाणार का?. सत्तेत सहभागी असलेले काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते प्राबल्य असलेल्या आपल्या पारंपरिक मतदारसंघात शिवसेनेला सोबत घेतील का? असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र गुरुवारच्या बैठकीतून त्यावरील संभ्रम आता बहुतांशी दूर झाला असून ‘सोबत घेतले तर ठीकच, नाहीतर स्वबळावर लढा’ असा स्पष्ट आदेशच शिवसेना भवनावरुन बजावण्यात आल्याने तालुक्यात होणार्‍या आगामी निवडणुका बहुरंगी होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *