महिलेला जातीवाचक शिवीगाळ करणार्‍यास सात वर्षे सक्तमजुरी

नायक वृत्तसेवा, राहुरी
महिलेला बळजबरीने दुचाकीवर बसवून नेत अत्याचाराचा प्रयत्न केला. परंतु, महिलेने विरोध केला म्हणून तिच्यावर सत्तुराने वार करुन जखमी करुन जातीवाचक शिवीगाळ केली. या प्रकरणाचा श्रीरामपूरचे तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते. याची सुनावणी पूर्ण होवून आरोपी आसिफ कबीर पठाण (रा.हरेगाव, ता.श्रीरामपूर) यास दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. तर दंडाची रक्कम न भरल्यास सहा महिने साधी कैद सुनावली आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, 2 फेब्रुवारी, 2020 रोजी पीडित महिला ही तिच्या बहिणीच्या आजारी मुलाला भेटण्यासाठी पढेगाव येथे जाण्यासाठी बेलापूर रिक्षा स्थानकावर उभी होती. त्यावेळी आरोपी आसिफ पठाण हा तेथे आला आणि खोटे बोलून दुचाकीवर बसण्यास भाग पाडले. त्यानंतर राहुरी कृषी विद्यापीठाच्या मोकळ्या जागेत झाडाझुडपात नेऊन ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे व मला तुझ्याशी लग्न करायचे आहे’ असे म्हणून पीडितेस बळजबरी करू लागला. त्यास पीडितेने तीव्र विरोध केला म्हणून आरोपीने सत्तुराने पीडितेच्या गळ्यावर, छातीवर, दंडावर, हाताचे पंजे व इतर भागावर वार करून जातीवाचक शिवीगाळ केली. याप्रकरणी राहुरी पोलिसांत गुरनं. 74/2020 अनुसूचित जाती-जमाती अन्याय अत्याचार प्रतिबंधक कायदा कलम 3 (2), (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास तत्कालिन उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. त्याची सुनावणी पूर्ण होवून अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एम. शेटे यांनी आरोपीस दोषी ठरवून सात वर्षे सक्तमजुरी व 25 हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास सहा महिने साधी कैद असेल, असे निकालात नमूद केले आहे. अनिल ढगे यांनी सरकारी पक्षाची बाजू मांडली तर महिला पोलीस नाईक अश्विनी पवार यांनी मोलाची कामगिरी बजावली. सदर खटल्यात एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले त्यात राहुल मदने यांची साक्ष महत्त्वाची ठरली. पैरवी अधिकारी म्हणून पोहेकॉ. तुपे यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *