काळे कारखाना एकरकमी अडीच हजार रुपये प्रतिटन भाव देणार! आमदार आशुतोष काळे; कामगारांची दिवाळी गोड करुन ऊस दराची कोंडी फोडली
नायक वृत्तसेवा, कोपरगाव
कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना दिवाळीनिमित्त अठरा टक्के बोनस देऊन कामगारांची दिवाळी गोड करणार आहे. तसेच, सात लाख टन उसाचे गाळप करून उत्पादकांना एफआरपीपेक्षा जास्त एकरकमी अडीच हजार रुपये प्रतिटन भाव देईल, अशी घोषणा करून, कारखान्याचे अध्यक्ष आमदार आशुतोष काळे यांनी सोमवारी (ता.25) अहमदनगर जिल्ह्यातील यंदाच्या उसदराची कोंडी फोडली.
कारखान्याच्या गळीत हंगामाचा प्रारंभ माजी आमदार अशोक काळे व त्यांच्या पत्नी पुष्पा यांच्या हस्ते उसाच्या मोळीचे पूजन करून करण्यात आला. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात आमदार काळे यांनी एकाच वेळी ऊस उत्पादक व कामगारांना खूषखबर दिली. यावेळी उपाध्यक्ष सुधाकर रोहोम, कारखान्याचे जनरल मॅनेजर सुनील कोल्हे, आसवनी विभागाचे जनरल मॅनेजर ज्ञानेश्वर आभाळे, सचिव बाबा सय्यद, सहाय्यक सचिव एस. डी. शिरसाठ, वर्क्स मॅनेजर दौलत चव्हाण, मुख्य अभियंता निवृत्ती गांगुर्डे, चीफ केमिस्ट सूर्यकांत ताकवणे, मुख्य लेखापाल सोमनाथ बोरनारे, शेतकी अधिकारी कैलास कापसे यांच्यासह संचालक मंडळ व ऊस उत्पादक उपस्थित होते.
यावेळी पुढे बोलताना आमदार काळे म्हणाले, यंदा कार्यक्षेत्रात सात लाख टन ऊस उपलब्ध आहे. त्यामुळे पुणतांबे गट वगळता कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणता येणार नाही. कारखान्याच्या कामगारांना मागील वर्षीप्रमाणे यंदाही अठरा टक्के बोनस दिला जाणार आहे. कारखान्याचे आधुनिकीकरण पूर्ण करून गाळप क्षमता वाढविली जाईल. उत्पादकांनी हेक्टरी ऊस उत्पादन वाढवून अधिक नफा मिळवावा. यावेळी ज्येष्ठ नेते छबूराव आव्हाड, एम. टी. रोहमारे, कारभारी आगवण, नारायण मांजरे, सभापती पौर्णिमा जगधने, उपसभापती अर्जुन काळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष माधव खिलारी, संभाजी काळे आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन संचालक अरुण चंद्रे यांनी करुन आभार मानले.