समीर वानखेडेंची मुख्यमंत्र्यांनी पोलिसांमार्फत चौकशी करावी ः तांबे जामखेड येथील काँग्रेसच्या आढावा बैठकीत केली मागणी

नायक वृत्तसेवा, नगर
क्रुज पार्टीत अंमली पदार्थ सेवन केल्याप्रकरणी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अटक केलेल्या आर्यन खानला सोडण्यासाठी पंचवीस कोटींची मागणी करून अठरा कोटीत डील फायनल करण्यास सांगणार्‍या एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे यांची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस विभागामार्फत चौकशी करावी. या प्रकरणात ब्लॅकमेलिंग झाल्याचे चौकशीत पुढे आले तर वनखेडेंवर कारवाई करावी अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

जामखेड येथे काँग्रेस पक्षाच्या आढावा बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना तांबे यांनी ही मागणी केली आहे. आर्यनला अटक प्रकरणात पंच असलेल्या व्यक्तीनेच (प्रभाकर साईल) अ‍ॅफिडेविट करून याबाबत माध्यमांत माहिती दिली आहे. त्याच्याकडून काही कोर्‍या कागदांवर सह्या देखील घेतल्या गेल्या आणि आपणासमोरच डील सुरू असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणी पोलिसांना आदेश देऊन चौकशी करावी, अशी मागणी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी केली आहे.

काँग्रेस पक्षाला संपवण्यासाठी सगळेजण एकत्र आले आहेत, असे व्यक्तव्य महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले होते. या वक्तव्यावर तांबे यांना पत्रकारांनी छेडले असता, महसूल मंत्री थोरातांचे हे वक्तव्य सर्व जातीयवादी असलेल्या शक्तींबद्दल असेल. कारण काँग्रेस पक्ष सर्व घटनेला अनुसरून सर्व जाती-धर्मांना सोबत घेऊन सर्वसमावेशक काम करत आला आहे. त्यामुळे जातीयवादी पक्षांना काँग्रेस नको आहे. त्यामुळे थोरातांनी हे वक्तव्य केले असावे असे तांबे यांनी स्पष्ट केले.

सांगलीचे खासदार संजय पाटील यांनी मी भाजपचा खासदार असल्याने माझ्या मागे ईडी लागणार नाही, असे म्हटले होते. त्यामुळे संजय पाटील हे मूळ काँग्रेसमध्ये राहिलेले आहेत. त्यामुळे प्रामाणिकपणे बोलणे हा गुण त्यांच्यात आहे. भाजप हे घाण कपडे स्वच्छ करण्याचे वॉशिंग मशीन आहे. त्यामुळे जो कोणी तिकडे जाईल तो धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो आणि ईडी, इन्कमटॅक्स, सीबीआयच्या चौकशा होत नाहीत हेच त्यांच्या वक्तव्यावरून शिक्कामोर्तब होतेय अशी टीप्पणी देखील यावेळी सत्यजीत तांबे यांनी केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *