‘चपराक’ दीपावली अंकाने गाठला एक लाख विक्रीचा टप्पा! यंदाचा पहिला अंक प्रकाशित तर दुसरा अंक लवकरच वाचकांच्या भेटीला

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेला दीपावली अंकांचे विशेष महत्त्व आहे. शंभर वर्षांहून अधिक काळ ही परंपरा सुरू आहे. मात्र या परंपरेत वाचकांसाठी वैशिष्ट्यपूर्ण अंक देवून ‘चपराक’ने एक लाख अंकांची विक्रीची उद्दिष्ट्ये ठेवत मराठी दीपावली अंकांत नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. गेली काही वर्षे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दीपावली अंक प्रकाशित करणे अनेक भांडवली वृत्तपत्रांनाही जिकिरीचे झाले आहे. अशावेळी चपराकने दिवाळी अंकांचा एक लाखांचा टप्पा पूर्ण करणे कौतुकास्पद असल्याचे बोलले जात आहे. एकाचवेळेस दोन अंक चपराक प्रकाशन प्रकाशित करणार असून, त्यातील पहिला अंक प्रकाशित झाला आहे. तर दुसरा अंक वाचकांना विशेष कथांचा अनुभूती देणारा असणार आहे.

पुणे येथून चपराक प्रकाशनच्यावतीने गेले काही वर्ष दीपावली अंकांमध्ये विविध प्रकारचे प्रयोग करण्यात येत आहे. प्रस्थापितांच्या पलीकडे जावून नवोदितांमध्ये अनेक चांगले लेखक शोधून त्यांना स्थान देण्याचा प्रयत्न केला आहे. दीपावली अंकामध्ये अनेक मान्यवरांचे वैचारिक लेखांसोबत इतरही मनोरंजनपर लेखांचा समावेश आहे. पहिल्याच दिवशी चपराकने सत्तर हजार अंक बाजारापेठेत वाचकांसाठी उपलब्ध करुन दिले आहेत. महाराष्ट्रातील मराठी वाचकांसाठी ही पर्वणी असली तरी भारतातील अनेक राज्यांमध्ये मराठी भाषेवर प्रेम करणारे अनेक वाचक आहेत. ते देखील दरवर्षी चपराकची वर्गणी भरुन दीपावली अंकाची मागणी करत असतात. यावर्षी भारतातील विविध राज्यांबरोबर परदेशातील वीस देशांमध्ये अंकांचे वितरण करण्यात आले आहे. जिथे जिथे मराठी वाचली तिथे तिथे मराठी वाचकांसाठी आर्थिक हिशोब न करता दीपावली अंक पोहोचविण्याचे काम संपादक घनश्याम पाटील करत आहेत. महाराष्ट्रातही अनेक मान्यवर इतरांना भेट देण्यासाठी चपराकचे दीपावली अंक खरेदी करत असतात.

यंदाच्या दीपावली अंकामध्ये ‘जिनांचे अखेरचे दिवस’ या संदर्भातील एका लेखाचा समावेश असून, त्यात जिनांच्या आयुष्यातील घटनाक्रम सविस्तररित्या मांडला आहे. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सूत्रसंचालक सुधीर गाडगीळ यांनी त्यांच्या पत्नी संदर्भातील आठवणी अत्यंत भावस्पर्शी शब्दांत व्यक्त केलेल्या आहेत. संजय सोनवणे यांनी येशू ख्रिस्तांच्या संदर्भाने अतिशय अभ्यासूपर्ण मांडणी केली आहे. संदीप वाकचौरे यांचा महात्मा गांधींच्या जीवनप्रवासातील त्यांची मोहिनी घालणारे आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीत त्यांचे योगदान या संदर्भातील लेखाचा समावेश आहे. त्यामुळे वैविध्यपूर्ण आणि परिपूर्ण असणार्‍या माहितीचा खजिना वाचकांना मिळणार आहे. त्यासाठी लवकरात लवकर अंक मिळवून वाचावा, असे आवाहन प्रकाशकाने केले आहे.

विजयादशमीच्या पूर्वीच चपराक दीपावली अंक…
महाराष्ट्राच्या दीपावली अंकांच्या परंपरेत साधारणपणे दरवर्षी दसर्‍याच्या शुभमुहूर्ताला मार्मिकचा अंक प्रकाशित होत असतो. त्यानंतर महाराष्ट्रातील विविध दैनिके, नियतकालिके, साप्ताहिके व विशेष वार्षिक असलेले अंक प्रकाशित होत असतात. दीपावली पाडव्याला महाराष्ट्रातील अनेक अंक वाचकांना उपलब्ध होतात. महाराष्ट्रात दरवर्षी सुमारे पाचशे ते सातशे दीपावली अंक प्रकाशित करण्यात येतात. त्यात दिवसेंदिवस अधिक भर पडत आहे. मात्र, चपराकने विजयादशमीच्या पूर्वीच अंक प्रकाशित करुन वाचकांना सुखद धक्का दिला आहे. त्याचबरोबर एक लाख वाचकांपर्यंत अंक पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रकाशन व्यवस्था प्रयत्न करत असली तरी देशभरातूनच आगावू नोंदणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *