विखेंच्या मध्यस्थीने ‘गो’ आंदोलनाला तात्पुरता विराम! पुढील आठवड्यात पोलीस अधीक्षक आंदोलकांना भेटणार..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेरातील गोवंश कत्तलखान्यांच्या विरोधात गेल्या आठवडाभरात दोनवेळा करण्यात आलेले आंदोलन पुन्हा एकदा स्थगित करण्यात आले आहे. गेल्या सोमवारी अप्पर अधीक्षकांच्या ‘लेखी हमी’ने तर बुधवारी आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शिष्टाईने सदरच्या आंदोलनाला विराम देण्यात आला. पुढील आठवड्याच्या सुरुवातीला जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी संगमनेरात येवून आंदोलकांची भेट घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर पुन्हा सुरु झालेले आंदोलन 30 तासांनंतर थांबवण्यात आले. आता यापुढील काळात घराघरात जावून या आंदोलनाबाबत जागृती करण्यात येणार आहे.

दोन आठवड्यांपूर्वी गांधी जयंतीच्या दिनी संगमनेरातील बेकायदा गोवंश कत्तलखान्यांवर राज्यातील सर्वात मोठी कारवाई करण्यात आली होती. या कारवाईनंतर संगमनेरातील गोप्रेमी नागरिक संतप्त झाले होते. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेसारख्या हिंदुत्त्ववादी संघटनांनी 4 ऑक्टोबरपासून त्या विरोधात आंदोलन पुकारीत येथील कत्तलखान्यांना पाठबळ देणार्‍या पोलीस अधिकार्‍यांचे निलंबन करुन त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. त्याच दिवशी सायंकाळी श्रीरामपूर विभागाच्या अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.दीपाली काळे यांनी आंदोलकांच्या मागणीप्रमाणे सात दिवसांत चौकशी करुन कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर सदरचे आंदोलन स्थगित करण्यात आले होते.

मात्र लेखी स्वरुपात ‘हमी’ देवूनही त्यांनी ठरलेल्या कालावधीत कोणतीही कारवाई न केल्याने अखेर मंगळवारी (ता.12) पुन्हा हिंदुत्त्ववादी संघटना एकत्रित झाल्या व त्यांनी प्रशासकीय भवनासमोर ठिय्या दिला. दिवसभर चाललेल्या या आंदोलनाला संगमनेरकरांनी मोठा प्रतिसादही दिला. त्याच दरम्यान विश्व हिंदू परिषदेचे प्रांताध्यक्ष शंकर गायकर यांनी राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी त्यांनी महासंचालकांना गोवंश कत्तलखान्यांवर संगमनेरात आजवर झालेल्या जवळपास साडेतिनशेहून अधिक कारवायांचा लेखाजोखा असलेली फाईलही सोपविली. एकाच प्रकारच्या गुन्ह्यात वारंवार तेच ते आरोपी सापडूनही त्यांच्यावर तडीपारीची कारवाई करण्यात झालेली टाळाटाळ, गुन्ह्यांच्या तपासात जाणीवपूर्वक त्रृटी ठेवण्याचे प्रकार, गोवंश कत्तलखान्यांवर छापा घालून अनेक प्रकरणात गोवंशाऐवजी म्हशींच्या मासांचे डीएनए अहवाल, कारवाई दरम्यान सापडलेल्या डायर्‍या आणि कागदपत्रांबाबतची माहिती त्यांना देण्यात आली.

त्यावरुन पोलीस महासंचालकांनी अहमदनगरच्या पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरुन चर्चा करीत कारवाईच्या सूचना दिल्या. बुधवारी (ता.13) दुपारनंतर आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनीही पोलीस अधीक्षकांशी दूरध्वनीवरुन चर्चा करीत संगमनेरात सुरु असलेल्या आंदोलनाची पार्श्वभूमी आणि आंदोलकांच्या रास्त मागण्यांबाबत लक्ष घालण्याची विनंती त्यांना केली. एकाच दिवशी झालेल्या या दोन्ही घडामोडींनंतर पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी पुढील आठवड्यात सोमवारी अथवा मंगळवारी संगमनेरात जावून आंदोलकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करुन योग्य ती कारवाई करणार असल्याचे सांगतिले. मात्र आंदोलन सुरु राहील्यास कोणतीही कारवाई करण्यास असमर्थतता दर्शविली.

मुंबईतून शंकर गायकर आणि लोणीतून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडून एकसमान उत्तरे प्राप्त झाल्याने व पोलीस अधीक्षकांसारख्या वरीष्ठ अधिकार्‍यांनी याबाबत कारवाईचे आश्वासन दिल्याने आंदोलकांनी सहभागी सर्व संलग्न संस्थांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी चर्चा करुन अधीक्षकांच्या सूचनेनुसार पुढील काही दिवस ठिय्या आंदोलन स्थगित करण्याचा एकमुखी निर्णय घेतला. बुधवारी (ता.13) सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास आंदोनाचे समन्वयक अ‍ॅड.श्रीराम गणपुले यांनी याबाबत उपस्थित असलेल्या सर्व कार्यकर्त्यांना याची माहिती देत आंदोलनाला तात्पुरता विराम देण्यात आल्याची माहिती दिली व यापुढील कालावधीत घराघरात जावून गोमातेबाबत जनजागृतीचा उपक्रम जाहीर केला.


मंगळवारी दुपारी साडेबाराच्या सुमारास सुरु झालेल्या आंदोलनाची 30 तासांनंतर सांगता झाली खरी मात्र, या दरम्यान दैनिक नायकने प्रसिद्ध केलेल्या ‘त्या’ डायर्‍यांची चर्चा मात्र शेवटपर्यंत रंगली होती. यावेळी छाप्यात सापडलेल्या डायर्‍यांची एकूण संख्या 22 असल्याची चर्चाही समोर आली तर आठव्या आणि नवव्या क्रमांकाच्या डायर्‍यांमध्ये कोणाकोणाची नावे आहेत यावरही काही आंदोलक टाळ्यावर टाळ्या देत ‘गडी टप्प्यात आल्याचे’ सांगत असल्याचे दिसले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *