एकोणीस सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आगामी वर्ष राहुरी तालुक्याच्या दृष्टीने ठरणार ‘निवडणूक पर्वणी’

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील 19 सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. त्यामुळे अनेक गावांत राजकीय हालचाली गतीमान झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 19 संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू झाली असून 9 पतसंस्थांसह 3 संस्थांचा सहभाग आहे. त्यामुळे संभाव्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुका स्थानिक राजकारणी व कार्यकत्यार्ंंना महत्त्वाच्या ठरणार आहेत.

कोरोना महामारी काळात 120 संस्थांची मुदत संपलेली आहे. एकूण सहा टप्प्यात सर्व संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये निंभेरे, चंडकापूर, अंमळनेर विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या निवडणुका कोरोनापूर्वी सुरू होत्या. त्यावेळी नामनिर्देशनही सुरू होते. नामनिर्देशनासाठी दोन दिवसांची मुदत असतानाच कोरोनाची परिस्थिती पाहून निवडणुकांना स्थगिती देण्यात आली. संबंधित संस्थांच्या निवडणुकांबाबत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवत नामनिर्देशन सुरू झाले आहे.

कोरोना कालखंडामध्ये मुदत संपलेल्या राहुरी तालुक्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम निबंधक कार्यालयातून जाहीर करण्यात आला आहे. 6 टप्प्यापैकी पहिल्या टप्यामध्ये टाकळीमियाँ, मोरवाडी, केंदळ खुर्द, चिखलठाण येथील सेवा संस्थांसह 9 पतसंस्था व ‘ड’ वर्गातील 3 संस्थांच्या निवडणुकांसाठी प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच निंभेरे, चंडकापूर, अंमळनेर या सहकारी संस्थांच्या निवडणुका सुरू झाल्या आहेत.


आगामी वर्ष राहुरी तालुक्याच्या दृष्टीने ‘निवडणूक पर्वणी’चे वर्ष आहे. देवळाली प्रवरा नगरपालिकेची निवडणूक पुढील महिन्यात होणार असल्याची चर्चा आहे. तेथील वार्डनिहाय रचनेचा कच्चा आराखडाही पूर्ण करण्यात आला आहे. तर राहुरी नगरपरिषद, डॉ. तनपुरे साखर कारखाना, जिल्हा परिषद, पंचायत समिती, बाजार समिती या महत्वाच्या निवडणुका आगामी वर्षापर्यंत होणार असल्याची चर्चा आहे. टाकळीमियाँ, मोरवाडी, गुरूदत्त, व चिखलठाण सहकारी संस्थेच्या निवडणुकीची जय्यत तयारी सुरू झाली आहे. कोरोना महामारीपूर्वी या संस्थांच्या निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र भरण्यास प्रारंभ झाला होता. परंतु ऐनवेळी कोरोनाची परिस्थिती पाहता निवडणुकांना स्थगिती देण्यात आली होती. संबंधित संस्थांच्या मतदार याद्या जैसे थै ठेवत अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.

28 सप्टेंबरपासून तीन संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू करावी, यासाठी निवडणूक विभागाकडे सविस्तर माहिती पाठविण्यात आली आहे. दरम्यान, ब वर्गातील मोरवाडी, टाकळीमियाँ, केंदळ खर्द व चिखलठाण यांसह क वर्गातील अभिनव ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वळण, जिजामाताई (साई समृद्धी) ग्रामीण बिगर शेती पतसंस्था सात्रळ, भाग्यलक्ष्मी ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बारागाव नांदूर, व्यंकटेश नागरी सहकारी के्रडिट को. ऑप. सोसा. राहुरी, मातोश्री ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था बारागाव नांदूर, कृषी कामगार सहकारी सेवक पतसंस्था कृषी विद्यापीठ (जिल्हास्तरावर), सौ. भागिरथीबाई तनपुरे प्राथमिक शहर सहकारी ग्राहक भांडार मर्या. राहुरी, पद्मभूषण ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. तांदूळवाडी तर ड वर्गातील उर्मी अभिनव औद्योगिक सहकारी संस्था राहुरी, देवळाली प्रवरा अभिनव औद्योगिक सहकारी मर्या., तुळजाभवानी अभिनव औद्योगिक सहकारी संस्था सात्रळ यांच्या निवडणुकांचा कार्यक्रम सुरू झाला आहे. मतदारांच्या प्रारूप याद्या मागविण्यात आलेल्या आहेत. अंतिम याद्या प्रसिद्ध होऊन निवडणूक विभागाच्या निर्देशानुसार संबंधित संस्थांच्या निवडणुकांबाबत प्रक्रिया पूर्ण करून घेतली जाणार असल्याची माहिती निबंधक कार्यालयातून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *