रोटरी क्लब संगमनेर करणार कमर्शिअल चक्की वाटप

नायक वृत्तसेवा, संगमनेर
समाजात अडचणीत असलेल्या विविध घटकांना मदत कशी करता येईल याचा विचार करुन सामाजिक क्षेत्रात सतत अग्रेसर असणार्‍या रोटरी क्लबतर्फे कोविड महामारीमध्ये, अपघातात किंवा आकस्मितरित्या घरातील कर्ता पुरुष गमाविलेल्या महिलांना त्यांच्या पायावर उभे राहता यावे. तसेच त्यांच्या दैनंदिन खर्चासाठी कुणावरही अवलंबून राहू नये यासाठी कमर्शिअल चक्की मोफत वाटप करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला आहे. याआधीही 15 ऑगस्ट रोजी कोविड महामारीमध्ये कर्ता पुरुष गमाविलेल्या 61 महिलांनी रोटरीतर्फे शिलाई मशीनचे वाटप राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते यशस्वीरित्या करण्यात आले होते.

शिलाई मशीन प्रकल्पामध्ये करण्यात आलेल्या भरीव मदतीमुळे समाजातील विविध संस्था, दानशूर व्यक्ती यांनी आम्हांलाही अशी मदत करायची आहे अशी इच्छा रोटरी सदस्यांजवळ व्यक्त केली. त्या अनुशंगाने ज्या महिलांचे पती कोविड महामारीमध्ये, अपघातात किंवा आकस्मातरित्या मृत पावले असतील व ज्यांचा घरखर्च हा सदर महिलांवर अवलंबून आहे अशा महिलांना मदत करता यावी या उद्देशाने कमर्शिअल आटाचक्की वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती प्रकल्प समितीमार्फत देण्यात आली आहे. सदर चक्कीद्वारे आपण दैनंदिन घरगुती दळण करु शकूच पण याशिवाय खारीक, खोबरे, मसाले, विविध डाळी याही या चक्कीमध्ये दळता येणार आहे. या प्रकल्पाच्या अधिक माहितीसाठी फक्त लाभार्थी होऊ इच्छिणार्‍या महिलांनी मे. एन. के. गाडे कार्यालय, योगेश गाडे (मोबा. 9822684402), दैनिक युवावार्ता कार्यालय, आनंद हासे (मोबा. 7720046002) यांना संपर्क करावा, त्यानंतर या प्रकल्पासाठी लागणारा अर्ज व सोबतची कागदपत्रे ही मागविली जातील व ती कोठे जमा करावयाची आहे याची माहिती दिली जाईल, अशी माहिती प्रकल्प समितीतर्फे देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *