पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाचे जोरदार पुनरागमन! शेवगाव तालुक्यात अतिवृष्टी; तीनशेहून अधिक जणांना सुरक्षित जागी हलविले


नायक वृत्तसेवा, संगमनेर
जवळपास संपूर्ण महिनाभर ओढ देणार्‍या वरुणराजाचे जिल्ह्यात पुनरागमन झाले असून धरणांच्या पाणलोटासह लाभक्षेत्रातही सर्वदूर कमी-अधिक प्रमाणात पावसाने हजेरी लावली आहे. सोमवारपासून जिल्ह्यात परतलेल्या मान्सूनला काही तालुके वगळता अन्यत्र फारसा जोर नसला तरीही या पावसाने करपून चाललेल्या खरीपाच्या पिकांना जीवदान मिळाल्याने बळीराजा सुखावला आहे. गेल्या पंधरवड्यापासून धरणांच्या पाणलोटातून गायब झालेला पाऊस आता हलक्या पावलांनी पुन्हा माघारी आल्याने धरणांत थांबलेली नवीन पाण्याची आवक काही प्रमाणात पुन्हा सुरु झाली असून स्थिरावलेले जलसाठे हलू लागले आहेत. मागील चोवीस तासांत उत्तर नगरजिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात सर्वाधीक 110 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. नानी नदीला अचानक आलेल्या पुरामूळे शेवगाव तालुक्यातील आखेगाव परिसरातील शंभरावर नागरिक अडकले असून त्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. आत्तापर्यंत तालुक्यातील दीडशेहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

राज्यात मान्सून दाखल झाल्यानंतर लागलीच जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात सलामी देणार्‍या वरुणराजाने अल्पावधीतच जिल्ह्यातून काढता पाय घेतला. त्यामुळे जूनच्या सुरुवातीला कोसळलेल्या तुरळक जलधारा वगळता जूनसह निम्म्याहून अधिक जुलैचा महिनाही कोरडा गेला. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात चिंता निर्माण झालेल्या असतांना आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यात वरुणराजाने पुनरागमन झाले आणि अवध्या पंधरा दिवसांतच चिंतेचे मळभ दूर हटून जिल्ह्यात चैतन्य निर्माण झाले. पाणलोटासह लाभक्षेत्रातही पावसाने जोर धरल्याने जिल्ह्यातील बहुतेक भागातील बळीराजाने खरीपाच्या पेरण्याही उरकल्या. पाणलोटातील पावसाचा जोर टिकून राहिल्याने दीर्घकाळ ओढ देवूनही 15 ऑगस्टपूर्वी भंडारदरा भरण्याच्या अपेक्षा उंचावलेल्या असताना ऑगस्टच्या सुरुवातीलाच पाणलोटासह जिल्ह्यातील पावसाने पूर्णतः विश्रांती घेतली. त्यानंतरच्या कालावधीत सोमवारपर्यंत अधुनमधून तुरळक सरी वगळता मोठ्या पावसाचा प्रदेश समजल्या जाणार्‍या धरणांच्या पाणलोटातूनही पाऊस गायब झाल्याने संपूर्ण जिल्हाच चिंतेच्या सावटाखाली आला होता.

मात्र बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने त्याचा फायदा राज्याला झाला असून गेल्या 24 तासांपासून जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटासह बहुतेक सर्वत्र पावसाचे पुनरागमन झाले आहे. विशेष म्हणजे सोमवारी (ता.30) जिल्ह्यात परतलेल्या मान्सूनला पाणलोटापेक्षा लाभक्षेत्रात अधिक जोर असल्याचे दिसून आले असून गेल्या चोवीस तासांत उत्तर नगरजिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात 85 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघरमध्ये 36 मिलीमीटर पाऊस झाला आहे, यावरुन पावसाचा जोर कोणत्या भागात अधिक आहे याचा अंदाज येतो. मोठ्या धरणांचे पाणलोट क्षेत्र मान्सूनच्या ढगांनी व्यापल्याने येत्या काही तासांत पावसाला जोर चढण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.

संगमनेर तालुक्यातील तळेगाव भागासह पठारभाग कमी पावसाचा दुष्काळी प्रदेश समजला जातो. या भागातील अर्थकारण खरीपाच्या पिकांवरच अवलंबून असते. जुलैच्या पावसाने सुखावलेल्या बळीराजाने या दोन्ही भागात सोयाबीनसह भुईमूग, बाजरी, हुलगे, मठ यासह पठारभागात मोठ्या प्रमाणात लाल कांद्याची (शेंद्री) लागवड करण्यात आली होती. मात्र जवळपास महिन्याभरापासून पावसाने पूर्णतः ओढ दिल्याने यंदाची खरीपाची पिकंही धोक्यात आली होती. त्यामुळे प्रवरा आणि मुळा नदीचा बागायती पट्टा वगळता तालुक्याच्या उर्वरीत संपूर्ण भागात चिंता निर्माण झाल्या होत्या. मात्र सोमवारपासून सुरु झालेल्या भीज पावसाने बळीराजाला मोठा दिलासा दिला असून करपण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या खरीपाला या पावसाने सावरले आहे.

एकीकडे मोठ्या धरणांच्या पाणलोटात परतलेल्या मान्सूनने चैतन्य निर्माण केले असताना दुसरीकडे आढळा व म्हाळुंगी नदीच्या खोर्‍यातील बळीराजाच्या चिंता मात्र अजूनही कायम असून या धरणांना अजूनही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यात सर्वदूर हजेरी लावणार्‍या वरुणराजाने या दोन्ही जलाशयांच्या पाणलोटाला मात्र पाठ दाखवली आहे. त्यामुळे यावर्षी ही धरणं भरतील की नाही अशी शंकाही निर्माण होवू लागली असून या धरणांच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्‍यांच्या चिंता वाढल्या आहेत. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर टिकून राहणार असल्याचा अंदाज वर्तविला गेल्याने येणार्‍या काळात आढळा व म्हाळुंगी नद्यांच्या पाणलोटात पाऊस होईल अशी आशा या परिसरातील बळीराजाला आहे. एकंदरीत संपूर्ण जिल्ह्यात पुनरागमन करणार्‍या वरुणराजाने शेतकर्‍यांच्या डोळ्यातील अश्रृ पुसून त्यांच्या चेहर्‍यावर हसू आणल्याने जिल्हा सुखावला आहे.

मागील चोवीस तासांत धरणांच्या पाणलोटातील मुळानगर धरण क्षेत्रात 46 मिलीमीटर, घाटघर 36 मिलीमीटर, रतनवाडी 18 मिलीमीटर, पांजरे 09 मिलीमीटर, भंडारदरा 08 मिलीमीटर, वाकी 05 मिलीमीटर, निळवंडे 03 मिलीमीटर, कोतुळ 07 मिलीमीटर, अकोले 03 मिलीमीटर, श्रीरामपूर 85 मिलीमीटर, लोणी 15 मिलीमीटर, आश्वी 11 मिलीमीटर, ओझर 08 मिलीमीटर, संगमनेर 06 मिलीमीटर व शिर्डी 04 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या चोवीस तासांत मुळा धरणात 118 दशलक्ष घनफूट नवीन पाण्याची आवक होवून पाणीसाठा 19 हजार 129 दशलक्ष घनफूट (73.57 टक्के), भंडारदरा धरणात 24 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होवून पाणीसाठा 9 हजार 414 दशलक्ष घनफूट (85.16 टक्के), निळवंडे धरणात 66 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक होवून पाणीसाठा 6 हजार 270 दशलक्ष घनफूट (75.36 टक्के), आढळा धरणात अवघे दोन दशलक्ष घनफूट पाणी दाखल होवून पाणीसाठा 560 दशलक्ष घनफूट (52.83 टक्के) व भोजापूर धरणाचा पाणीसाठा उणे 81 दशलक्ष घनफूटावर (22.44 टक्के) स्थिर आहे.


सोमवारपासून सुरु असलेल्या पावसाने शेवगाव तालुक्यात अक्षरशः हाहाकार माजवला आहे. नद्या, ओढे व नाले वेगाने वाहू लागल्याने तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. नानी नदीला आलेल्या अचानक पुराने आखेगाव जलमय झाले असून अनेक पाळीव जनावरे वाहून गेली आहेत. गेली संपूर्ण रात्र कोसळणार्‍या जलधारांनी शेवगाव तालुक्यातील ग्रामीणभागात भितीचे वातावरण निर्माण केले होते, त्यामुळे कालची रात्र बहुतेक तालुक्याने जागे राहूनच काढली. कालपासून सुरु असलेल्या अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका तालुक्यातील आखेगावसह भगूर व वडूले या गावांना बसला असून पुराच्या पाण्यात फसलेल्या तेथील शंभराहून अधिक नागरिकांना सुरक्षित स्थळी नेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *