दर कोसळल्याने समशेरपूरमध्ये टोमॅटो उत्पादकांचे आंदोलन

नायक वृत्तसेवा, अकोले
टोमॅटोचे दर कोसळल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकर्‍यांना सरकारने एकरी किमान 50 हजार रुपयांचे अनुदान तातडीने द्यावे, या मागणीसाठी किसान सभा व समविचारी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी समशेरपूर (ता.अकोले) बाजार समितीत आंदोलन केले.

टोमॅटो दराचा प्रश्न सुटावा, यासाठी नेपाळ, पाकिस्तान व बांगलादेश या शेजारील राष्ट्रांना निर्यात करताना येणार्‍या अडचणी तातडीने सोडवाव्यात, महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत टोमॅटोची कोठे मागणी आहे, याचा शोध घेऊन, त्या राज्यांना टोमॅटो पुरविण्यासाठी पणन विभागाने तातडीने पावले उचलावीत. लॉकडाउनमुळे अनेक ठिकाणी टोमॅटो प्रक्रिया उद्योग बंद आहेत. विशेष प्रोत्साहन व सवलती देऊन ते सुरू करण्याबाबत सरकारने पावले टाकावीत. बाजार समित्यांत शीतगृहांची उभारणी करावी, तसेच टोमॅटो उत्पादकांना माल तारण कर्ज उपलब्ध करून द्यावे. सर्व निविष्ठा, खते, कीटकनाशके योग्य दरात मिळतील यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा, अशा मागण्या यावेळी टोमॅटो उत्पादकांनी केल्या. राज्यकर्त्यांनी व विरोधकांनी या संकटाच्या काळात तरी एकमेकांवरील चिखलफेक थांबवावी व टोमॅटो उत्पादक शेतकर्‍यांना दिलासा देण्याबद्दल गांभीर्याने पावले टाकावीत, असे न झाल्यास सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या दारात टोमॅटो ओतण्याचे आंदोलन हाती घ्यावे लागेल, असा इशारा आंदोलकांनी दिला. डॉ. अजित नवले, संदीप दराडे, महेश नवले, सुरेश नवले, एकनाथ मेंगाळ, तुळशीराम कातोरे, पांडुरंग कातोरे, अविनाश धुमाळ, शंकर चोखंडे, तुकाराम मेंगाळ, दगू एखंडे, निवृत्ती बेनके, सुनील दराडे आदिंसह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *