पावसाच्या संततधारेने खरीप पिकांना नवसंजीवनी! अद्यापही पठारभागातील शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत..

नायक वृत्तसेवा, घारगाव
गेल्या काही दिवसांपासून बळीराजाला हूल देणार्‍या वरुणराजाने सोमवारी (ता.30) हजेरी लावली. यामुळे खरीप हंगामातील सोयाबीन, भुईमूग, बाजरी, कडधान्य, लाल कांदा आदी पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सलग चार दिवस पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविण्यात आला आहे. आजही पावसाची संततधार सुरूच आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या असल्या तरी अद्यापही पठारभागातील (ता.संगमनेर) पाण्याचे स्त्रोत कोरडेठाक आहे. पावसाच्या भरवशावर लाल कांद्याच्या लागवडी केल्या आहेत; त्यांनाही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे.

पठारभागातील घारगाव, डोळासणे व साकूर कृषी मंडळात शेतकरी खरीप हंगामात सोयाबीनसह इतर पिकांची पेरणी करतात. यावर्षी अनुक्रमे 2517, 1950 व 217 हेक्टर तर गेल्या वर्षी 1708, 886 व 45 हेक्टर असा सोयाबीनचा पेरा झाला होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सोयाबीनचा पेरा वाढला असल्याचे दिसून येते. मात्र, यंदा पावसाने बळीराजाचे अंदाज फोल ठरविल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली होती. अशातच सोमवारपासून वरुणराजाची संततधार सुरू झाल्याने सुकू लागलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.

याचबरोबर लाल कांद्याचे आगार म्हणून ओळख असलेल्या पठारभागातील लाल कांद्याचे क्षेत्रही यंदा वाढले आहे. गेल्या वर्षी घारगाव मंडळ 1708, डोळासणे 886 व साकूर 45 हेक्टर तर यंदा अनुक्रमे 393.60, 1780 व 89 हेक्टर क्षेत्र लागवडीखाली आलेले आहे. लाल कांद्याच्या उत्पादनावर येथील शेतकर्‍यांचे संपूर्ण अर्थकारण फिरत असते. त्यातच गेल्या दीड वर्षापासून कोविड संकटाने शेती व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झालेला आहे. अशातच सरकारची अनास्था व निसर्गाचा लहरीपणा शेतकर्‍यांच्या मूळावर उठला आहे. तरी देखील एकामागोमाग येणार्‍या संकटातून सावरत हंगाम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेत आहेत. त्यातच गेल्या काही दिवसांपासून लपून बसलेल्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर आनंदाची लकेर उमटली आहे.

सोमवारपासून सुरू झालेल्या पावसाने शेतीपिकांना दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी इथून पुढ गादी वाफ्यावरच लागवड करावी. यातून नुकसानीचा धोका कमी असतो आणि पिकाची एकसारखी वाढ होते.
– प्रवीण गोसावी (तालुका कृषी अधिकारी-संगमनेर)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *