लाभक्षेत्रासह धरणांच्या पाणलोटातूनही पाऊस झाला गायब! जिल्ह्यातील धरणांमध्ये अर्धवट पाणीसाठा; समन्यायी पाणी वाटपाचीही टांगती तलवार

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या चोवीस तासांत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांसह धरणांच्या पाणलोटातील पाऊस ‘गायब’ झाला आहे. त्यामुळे धरणांतील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात खालावली असून जिल्ह्यातील बहुतेक सर्वच धरणं अद्यापही पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत. अकोले तालुक्यातील उत्तरेकडील आढळा खोर्‍याची अवस्था तर अत्यंत चिंताजनक असून आत्तापर्यंतच्या कालावधीत या धरणाच्या पाणलोटात पावसाने जोर धरलेला नाही. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या मुळा धरणातही सध्या 72 टक्के पाणी असून भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 89 टक्क्यांवर स्थिर आहे. जायकवाडी धरणातील पाणीपातळी अजूनही 55 टक्क्यांवर असल्याने जिल्ह्यावर समन्यायी पाणी वाटप कायद्याची टांगती तलवारही असल्याने जिल्ह्याच्या चिंता वाढल्या आहेत. मागील चोवीस तासांत जिल्ह्यातील सर्वच धरणांच्या लाभक्षेत्रासह चक्क पाणलोट क्षेत्रातही कडक ऊन पडले असून धरणं भरण्यासाठी आता परतीच्या पावसाची प्रतीक्षा करावी लागते की काय अशी स्थिती निर्माण होवू लागली आहे.

अहमदनगर जिल्ह्याच्या अर्थकारणाला बळकटी देणार्‍या मुळा, भंडारदरा व निळवंडे धरणाच्या पाणलोटात वेळेवर आगमन झालेल्या पावसाने प्रदीर्घ ओढ दिली होती. त्यामुळे मान्सूनच्या आगमनापासूनच जिल्ह्यात चिंता निर्माण होण्यास सुरुवात झाली होती. मात्र यामागील काही अनुभवांवरुन आषाढीच्या पूर्वसंध्येला पावसाचे पुनरागमन होण्याचे संकेत कायम राहिल्याने 19 जुलैपासून सुरु झालेल्या संततधार पावसाने जिल्ह्यातील मोठ्या धरणांचा नूरच पालटून टाकला. गेल्या महिन्याच्या मध्यापर्यंत या तीनही धरणांच्या पाणलोटात रिमझिम वगळता पाऊसच नसल्याने चिंता दाटल्या होत्या, त्यातच भर पावसाळ्यात शेतीसाठी आवर्तन सोडण्याची पाळी जलसंपदावर आल्याने धरणातील साठे वाढण्याऐवजी कमी होवू लागल्याने दररोज चिंता वाढत होत्या. मोठ्या कालावधीनंतर धरणांच्या पाणलोटातील पाऊस पूर्णतः थांबल्याने आता पुन्हा एकदा जिल्हावासियांच्या चिंता वाढू लागल्या आहेत.

अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील 3 हजार 914 हेक्टरवरील रब्बी पिकांसाठी उपयुक्त ठरणार्‍या आढळा धरणाची आजची अवस्था चिंताजनक असून धरणात आत्तापर्यंत रडतखडत क्षमतेच्या 52.36 टक्के पाणी जमा झाले आहे. या धरणाला डावा आणि उजवा कालवा असून 8.80 किलोमीटर लांबीच्या आणि 42 क्युसेक्स वहन क्षमता असलेल्या डाव्या कालव्यावर 1 हजार 492 हेक्टर तर 11.80 किलोमीटर लांबीच्या आणि 68 क्युसेक्स वहन क्षमता असलेल्या उजव्या कालव्यावर 2 हजार 422 हेक्टर सिंचन केले जाते. याशिवाय संगमनेर व अकोले तालुक्यातील प्रत्येकी सहा आणि सिन्नर तालुक्यातील दोन अशा एकूण चौदा गावांचा पाणी परुवठाही आढळा धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. सध्या धरणातील पाणीसाठा पिण्यासाठी उपलब्ध असला तरीही सिंचनासाठी आवश्यक असलेले पाणी अजूनही धरणात दाखल झालेले नसल्याने या तीनही तालुक्यातील सुमारे चार हजार हेक्टर क्षेत्रावरील पिके संकटात आली आहे.

जिल्ह्यातील सर्वात मोठ्या क्षमतेच्या मुळा धरणाचा एकूण पाणीसाठाही आता 72.30 टक्के णाला असून जिवंत पाणीसाठा 66.51 टक्क्यांवर पोहोचला आहे. मुळा खोर्‍यातील पावसानेही गेल्या चोवीस तासांपासून पूर्णतः उघडीप दिली असून मुळा नदीचा प्रवाह आकुंचित होवू लागला आहे. सध्या कोतुळनजीकच्या मुळा नदीपात्रातून धरणात 867 क्युसेक्स वेगाने पाणी जमा होत असून गेल्या चोवीस तासांत धरणात 70 दशलक्ष घनफूट पाणी दाखल झाले आहे. भंडारदरा धरणाची अवस्थाही यासारखीच असून धरणात दाखल होणार्‍या नवीन पाण्यात मोठी घट झाली आहे. त्यातच सध्या धरणाच्या विद्युतगृहाच्या मोरीद्वारे 830 क्युसेक्सचा प्रवाह सोडला जात असून त्याद्वारे विद्युत निर्मिती सुरु आहे. भंडारदरा धरणाचा पाणीसाठा आज सकाळी सहा वाजता 88.85 टक्क्यांवर पोहोचला असून गेल्या काही दिवसांपासून तो याच पातळीवर नियंत्रित ठेवण्यात आला आहे.

कालव्यांची प्रतीक्षा असलेल्या निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कळसूबाईच्या शिखरांवर सोमवारी सकाळपासून लख्ख सूर्यप्रकाश पडला असून कृष्णवंतेचे पात्र रोडावले आहे. त्यामुळे वाकीजवळील जलाशयाच्या भिंतीवरुन कोसळणारा जलप्रपातही संकुचित झाला असून आज सकाळी सहा वाजता वाकी जलाशयाकडून अवघा 98 क्युसेक्सचा प्रवाह रंध्याजवळ निळवंडेच्या जलाशयात दाखल होत आहे. धरणात सध्या 69.56 टक्के पाणीसाठा असून धरणातील पाण्याचा फुगवटा वाढल्याने रंध्याचे सौंदर्य कमी होवू लागले आहे. मुळा व प्रवरा खोर्‍यातील पावसाने विश्रांती घेतली असली तरीही धरण क्षेत्राकडे पर्यंटकांचा ओढा कायम आहे.


समन्यायी पाणी वाटपाच्या कायद्यानुसार जायकवाडी धरणातील एकूण पाणीसाठा 65 टक्क्यांवर जाईस्तोवर वरील भागातील धरणांमध्ये पाणी साठवता येत नाही. सध्या जायकवाडीत एकूण क्षमतेच्या 55 टक्के पाणी असून त्यातील 41.46 टक्के पाणी उपयुक्त आहे. या धरणाची सध्याची स्थिती लक्षात घेता पावसाने पूर्णतः विश्रांती घेतल्यास नगर व नाशिक जिल्ह्यातील धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यासारखी स्थिती निर्माण होण्याची शक्यताही निर्माण होवू लागली आहे. त्यामुळे थांबलेल्या पावसाने या दोन्ही जिल्ह्यातील नागरिकांच्या चिंतेत मोठी भर घातली आहे.

गेल्या चोवीस तासांत भंडारदरा, घाटघर, रतनवाडी, पांजरे, उडदावणे, सांम्रद, वाकी, निळवंडे, आढळा, कोतूळ व अकोले या पाणलोटातील क्षेत्रांसह संपूर्ण लाभक्षेत्रातील पाऊस पूर्णतः गायब झाला असून सर्वत्र सूर्यनारायणाने दर्शन दिले आहे. आज सकाळी सहा वाजता संपलेल्या चोवीस तासांत मुळा धरणात 18 हजार 800 दशलक्ष घनफूट (72.30 टक्के), भंडारदरा 9 हजार 808 दशलक्ष घनफूट (88.85 टक्के), निळवंडे 5 हजार 793 दशलक्ष घनफूट (69.56 टक्के), आढळा 555 दशलक्ष घनफूट (52.36 टक्के) व भोजापूर 77 दशलक्ष घनफूट (21.33 टक्के) इतका पाणीसाठा आहे. 24 तासांत मुळा धरणात 70 दशलक्ष घनफूट, भंडारदरा धरणात 63 दशलक्ष घनफूट व निळवंडे धरणात 73 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *