चोरट्यांचा पाठलाग करताना नेवाशाचे पोलीस निरीक्षक जखमी

चोरट्यांचा पाठलाग करताना नेवाशाचे पोलीस निरीक्षक जखमी
पळून जाणार्‍यांपैकी एका आरोपीस पकडण्यात पोलिसांना यश
नायक वृत्तसेवा, नेवासा
दुचाकीस्वारांना लुटणार्‍या चोरट्यांचा पाठलाग करताना नेवासा ठाण्याचे पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांच्या हाताला झटापटीत जखमेसह किरकोळ मोडतोड झाली आहे. मात्र त्यांना पळून जाणार्‍यांपैकी एका आरोपीस पकडण्यात यश आले आहे.


याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, नेवासा तालुक्यातील श्रीरामपूर रस्त्यावर असलेल्या पुनतगाव फाट्यावर गुरुवारी (ता.10) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवर जाणार्‍या प्रवाशांना वाटेत अडवून रस्तालूट होत होती. सदरच्या घटनेची खबर घेऊन दुचाकीस्वाराचा भाऊ पोलीस ठाण्याला आला होता. याबाबत त्वरीत तपास म्हणून पोलीस फौजफाटा पोलीस निरीक्षक रणजीत डेरे यांच्यासमवेत पुनतगाव फाटा परिसरात पेट्रोलिंगसाठी निघाला. त्यावेळेस त्यांना रस्तालूट करणारे संशयित म्हणून आढळून आले. पोलिसांचे वाहन पाहताच अज्ञात चोरांनी परिसरातील शेतामध्ये धूम ठोकली. त्यांचा पाठलाग पोलीस करत असताना जीव धोक्यात घालून पोलीस निरीक्षक डेरे यांनी एकजणास पकडले. त्याला पकडण्यासाठी झालेल्या झटापटीत डेरे यांच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली व यामध्ये त्यांचा हात फॅक्चर झाला.


दरम्यान, पकडलेल्या चोरास चालक मोहन गायकवाड व इतर पोलीस कर्मचारी नेवासा पोलीस ठाण्यात घेऊन आले. त्यानंतर डाव्या हाताला मार लागलेल्या पोलीस निरीक्षक डेरे यांना नेवासा फाटा येथील श्वास हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश काळे यांनी तात्काळ त्यांच्यावर योग्य ते उपचार केले. त्यानंतर त्यांना आराम घेण्यास सांगितले. या प्रकाराबाबत एकीकडे पोलिसांच्या जिगरबाज कामगिरीचे नागरिकांकडून कौतुक होत असून पोलीस निरीक्षकांना झालेल्या दुखापतीबद्दल हळहळही व्यक्त करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *